नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागून राहीले आहे. वृत्तवाहिन्यावर चालणारा या मतदारसंघातील टॉक शोमधील गोंधळ पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडणूक जड जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मुद्यावरील लढाईला गुद्याचे स्वरूप आल्याने हा वाद आता वृत्तवाहिनीवरुन थेट पोलिस ठाण्यात जावून पोहोचला आहे. ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीच्या रणागंण या निवडणूक विषयक कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह, पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी मनसेच्या पदाधिकांर्यांना, महिला कार्यकर्त्यांनना धक्काबुक्की केल्याचे सांगत महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर भरत नखाते, नगरसेवक राजू शिंदेसह कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे शहर अध्यक्ष व बेलापुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गजाजन काळे यांनी उघडपणे केली आहे.
शनिवारी सकाळी ११च्या सुमारास वाशीमध्ये जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीतर्फे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘रणागंण’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव भगत, मनसेचे उमेदवार गजानन काळे, प्रकल्पग्रस्त आघाडीचे डॉ. राजेश पाटील सहभागी झाले होते. राष्ट्रवादीकडून गणेश नाईकांचे प्रतिनिधी म्हणून नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आणि भाजपाकडून मंदा म्हात्रे यांचे प्रतिनिधी म्हणून वर्षा भोसले, शिवसेनेचे विजय नाहटा यांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे सहभागी झाले होते.
वृत्तवाहिनीच्या टॉक शोचा पहिला टप्पा उमेदवाराची धोरणे, परिचय व भूमिका यात गेला. दुसर्या टप्प्यात उपस्थित नागरिकांनी प्रश्न विचारायचे होते. त्या सवाल जबाबामध्ये गजानन काळेंना तुम्ही बाहेरचे उमेदवार आहात का,असा प्रश्न झाला असता त्यांनी मी नवी मुंबईचा असून शिवसेनेचे उमेदवार मात्र चर्चगेटला राहणारे आहेत असे सांगितले. शिवसेना उमेदवार विजय नाहटा हे गणेश नाईकांवर पाच टक्के म्हणून सातत्याने आरोप करत आहेत. मग आयुक्तपदाच्या काळात नाहटा गप्प का होते, कमिशन त्यांनाही मिळत होते का? असा प्रतिप्रश्न गजानन काळेंनी उपस्थित केला.
नवी मुंबईचे महापौर सागर नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वृत्तवाहिन्यांच्या टॉक शोला हजर राहत असले तरी इतर वक्ते बोलत असताना मध्ये मध्ये हातवारे करून सतत बोलण्याची सवय नवी मुंबईकरांनी जवळून पाहिली आहे. झी वृत्तवाहिनीच्या टॉक शोमध्ये शिवसेनेचे विजय नाहटा आणि भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी सागर नाईकांशी केलेला संवाद नवी मुंबईकरांनी पाहिला असून १८ मिनिटाची क्लीप व्हॉटस अप व अन्य सोशल मिडीयावर दोन दिवसापासून फिरत आहे.
शनिवारीदेखील मनसेचे गजानन काळे बोलत असताना सागर नाईक सातत्याने हातवारे करत बोलतच होते. मनसेच्या गजानन काळेंनीदेखील अखेरीला सागर नाईकांनी हातवारे करूनच उत्तर देण्यास सुरूवात केली. यावर गोंधळ वाढत गेला आणि बोलण्यासारखे काही न राहील्याने राष्ट्रवादीच्या उपस्थित घटकांनी गुद्यावर सुरूवात केल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष व बेलापुरचे उमेदवार गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रमात हुल्लडबाजी करत असल्याचे सांगून काळे पुढे म्हणाले की, महापौरांनी इतर बोलत असताना हातवारे केल्याचे चालतात. इतरांनी केले तर सहन होत नाही. महापौरांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यावर राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांनी, नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत धक्काबुक्की केल्याचा आरोप काळे यांनी केला.
या धक्काबुक्कीला मनसेच्या महिला पदाधिकार्यांनाही सामोरे जावे लागले.
या दादागिरीचा मनसेच्या वतीने निषेध करून पोलीस, निवडणूक आयोग आणि महिला आयोगाकडेही दाद मागणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
महापौर हे महत्वाचे पद आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार आहे. दमदाटीची, दहशतीची भाषा तुम्हाला शोभत नाही. प्रत्येक टॉकशोमध्ये दुसरा बोलत असताना हातवारे करणे महापौरपदाला शोभत नसल्याचे काळे यांनी सांगितले.
महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर भरत नखाते, नगरसेवक राजू शिंदेसह उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि राष्ट्रवादीची दादागिरी पाहता निवडणूक आयोगाने ऐरोली व बेलापुर मतदारसंघात विशेष लक्ष घालण्याची मागणी काळे यांनी पत्रकार परिषदेत केली.