* बोनकोडे-घणसोलीत संदीप नाईक यांच्या प्रचाराचा झंझावात
* सर्वधर्मसमभावनेची प्रचार फेरीत रुजवण
नवी मुंबई : नवी मुंबईची जनता सुज्ञान असून शहराचा कोणी विकास केला? हे नवी मुंबईच्या जनतेला चांगलेच माहीत आहे. विरोधकांनी खोट्या आश्वासनांचा सपाटा लावला आहे. ‘अच्छे दिन’ म्हणत मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र नवी मुंबईकर विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास आहे. आम्ही जो शब्द देतो तो पाळतो, असे ठाम मत ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी व्यक्त केले.
शनिवारी (ता.१२) बोनकोडे, बोनकोडे गाव, खैरणे गाव, कोपरखैरणे सेक्टर ८ व ९ तसेच घणसोलीमधील सेक्टर १ ते ९ मधील घरोंदा व सिम्प्लेक्स विभागात नाईक यांची प्रचारफेरी काढण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रचार फेरीप्रसंगी नाईक यांच्यासह नगरसेविका वर्षा नाईक, नगरसेवक कोंडीबा तिकोने, नगरसेवक केशव म्हात्रे, नगरसेवक संजय पाटील, समाजसेवक प्रमोद पाटील, महिला सदस्य कमलताई पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. प्रत्येक चौकात लाडके उमेदवार नाईक यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशाच्या गजरात महिलांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले.
युवा उमेदवार नाईक यांनी यावेळी सर्व प्रभागात पायी फिरून विकासालाच मत द्या, असे आवाहन केले. प्रचाराच्या चौक सभेप्रसंगी उमेदवार नाईक हे मतदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गावातील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सतत आमदार म्हणून विधानसभेत पाठपुरावा केला. परंतु या निर्णयाला कॉंग्रेसने उशीर केला. आपापसात भांडणे लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु नवी मुंबईची जनता सुज्ञान असून कोण काय करते,
यांची माहिती त्यांना आहे.
नाईक पुढे म्हणाले की, सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी आपण
विधानसभेत अनेक वेळा प्रश्न मांडला असून या चांगल्या कामाला यश मिळाले आहे. आपल्या प्रभागाचा विकास हा निश्चितपणे होणार आहे. ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी आजवर सर्वधर्मसमभावनेची जोपासना केली आहे. घणसोली-खैरणे आणि बोनकोडे परिसरात स्थानिक नागरिकांसह माथाडी कामगार आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. प्रचार फेरीदरम्यान नाईक यांनी बोनकोडे येथील हजरत शहा दर्ग्याला भेट दिली. याप्रसंगी मुस्लीम बांधवांनी त्यांचे स्वागत केले. घणसोली येथील विठ्ठल मंदिरालाही त्यांनी भेट दिली.