सुजित शिंदे
नवी मुंबई : आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये नवी मुंबईकरांनी मला विक्रमी मताधिक्क्याने निवडून दिले आहे. यंदाच्या निवडणुकीतही जनतेची अशीच साथ मला मिळेल, असा दुर्दम्य आत्मविश्वास बेलापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांनी रविवारी व्यक्त केला.
वाशी परिसरात रविववारी लोकनेते नाईक यांची निवडणूक प्रचारफेरी निघाली. तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.२४ तास पाणीपुरवठा,३० लाख लोकसंख्येला पुरेल इतकी व्यवस्था असणारी एसटीपीची मलनिस्सारण केंद्रे अशी अनेक विकास कामे केली आहेत. मोरबे धरण परिसरात सौर उर्जेवर आधारित उर्जाप्रकल्प सुरु होतो आहे. यामुळे वीज पुरवठ्यात शहर स्वयंपूर्ण होणार आहे. एलबीटी अडीच टक्क्यांवरुन दीड टक्के करुन ऍम्नेस्टी योजना जाहीर करुन व्यापारी आणि उद्योजक वर्गाला दिलासा दिला. अशा लोककल्याणकारी कामांची माहिती त्यांनी नागरिकांना यावेळी दिली. शहराचा विकास केल्याने सुज्ञ जनता येत्या १५ ऑक्टोबर रोजी आपल्याला जिंकून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनी पॉवर आणि मसल पॉवर जास्त काळ टिकत नाही मात्र मॉरल पॉवर चिरकाल टिकते, असे ते म्हणाले.
२.५ एफएसआयच्या माध्यमातून सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुर्नविकासाचा निर्णय झालाच नाही, असा खोटा प्रचार विरोधक करीत आहे. त्यांचा खोटारडेपणा चालणार नाही. याबाबतच शासन निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जनतेची दिशाभूल करणार्यांना जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल केला.