* डॉ. संजीव नाईक यांचा टोला
सुजित शिंदे
नवी मुंबई : नजरेसमोर पराभव स्पष्ट दिसू लागल्याने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा हे काहीही बरळू लागले असून खोटे-नाटे आरोप करु लागले असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी नाहटा यांना लगावला आहे.
नाहटा यांनी आज (ता.१३) पत्रकार परिषद घेऊन सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या शासन निर्णयाचा जो लेखी पुरावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे काल रविवारच्या (ता.१२) पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आला, तो खोटा असल्याचे निरर्थक विधान केले आहे. त्यावर डॉ.नाईक यांनी खुलासा करताना सांगितले की, माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त केलेल्या कागदपत्रांचा हा पुरावा असून स्वत: प्रशासकीय पदावर काम केलेल्या नाहटा यांना या कागदपत्रांच्या खरेपणा विषयी शंका यावी याचे आश्चर्य वाटते.
विकास कामांचे भूमिपूजन करताना आणि त्यानंतर या विकास कामांच्या उद्घाटनास राष्ट्रवादीचे नेते उपस्थिती लावतात. मधल्या काळात या विकास कामांना भेटी देत नाही, अशा केलेल्या बिनबुडाच्या टीकेचादेखील नाईक यांनी खरपूस समाचार घेतला आहे. विकास कामांच्या पाहणी दौर्याची, आढावा बैठकांची, प्रत्यक्ष भेटीची इत्यादी विषयी सविस्तर माहिती हवी असेल तर आमच्या उमेदवारांनी प्रसिध्द केलेल्या त्यांच्या कार्य अहवालाचा नाहटांनी जरुर अभ्यास करावा म्हणजे त्यांना कळेल विविध विकास कामांच्या यशस्वी पूर्ततेसाठी आम्ही किती परिश्रम घेतले आहेत. जर नाहटांना आणखी पुरावे हवे असतील तर ते आम्ही केव्हाही त्यांना द्यायला तयार आहोत, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.
महापालिकेत केवळ प्रशासकीय अधिकारी असणारे नाहटा या शहरात झालेल्या विकास कामांचे श्रेय उपटण्याचा करीत असलेला प्रयत्न हास्यास्पद आहे.कोणतेही विकास काम न केल्याने त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणूनच खोटे बोला पण रेटून बोला, अशा पध्दतीने नागरिकांची दिशाभूल नाहटा करीत आहेत. त्यांना येत्या १९ ऑक्टोबर रोजी निवडणूक निकालाच्या दिवशी त्यांची जागा काय आहे हे कळून येईल, असे नाईक म्हणाले.
विलास जाधव खून प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे. विलास जाधवच्या कुटुंबियांनी न्यायालयीन लढा सुरु ठेवला आहे. या प्रकरणी विलासच्या कुटुंबियांनीच शिवसेनेच्या उमेदवारावर आरोप केले आहेत. आपला उमेदवार अडचणीत आल्याने नाहटा त्याची कातडी वाचविण्यासाठी असे आरोप करीत आहेत.