सुजित शिंदे
नवी मुंबई : राजकारण्यांसाठी आणि प्रस्थापितांसाठी बेलापुर मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची आणि राजकीय अस्तित्वाची बनलेली असता रविवारी सांयकाळी मनसेच्या महारॅलीचे ठिकठिकाणी जनतेकडूनच उत्स्फूर्त स्वागत केल्याने प्रस्थापितांची झोपच उडाली असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बेलापुर सेक्टर १ येथील गावस्कर मैदानापासुन सुरू झालेल्या या महारॅलीची सांगता विलास घोणे आणि विठ्ठल गावडे यांच्या बालेकिल्ल्यात सानपाडा-पामबीचवरिल मोराज सर्कल येथे झाली. बेलापुर-सीवूड्स-जुईनगर भागात महारॅलीला नागरिकांचा ठिकठिकाणी मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता मनसेचा गजानन कोणाकोणाचे विसर्जन करणार याची राजकारणात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने या महारॅलीत सहभागी झाले होते. ‘रेगे’ चित्रपटाचे निर्माते अभिजित पानसेंसह मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा कलाकार संतोष जुवेकरदेखील या रॅलीत सहभागी होवून मनसैनिकांचा उत्साह वाढविताना दिसला.
महारॅलीतील मनसैनिकांचा सहभाग आणि मनसैनिकांकडून महारॅलीदरम्यान दिल्या जाणार्या गगनभेदी घोषणांनी बेलापुर विधानसभा मतदारसंघ मनसेमय झाला होता.