* १२ डिसेंबरला चित्रपट रिलीज होणार
अनंतकुमार गवई
मुंबई : लोकनेते, बहुजनांचा नाथ- गोपीनाथ अशा उपाधीने गौरविलेले भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची ‘संघर्षयात्रा’ वर्षभरात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी १२ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. भाजप चित्रपट युनियन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाचे नाव अर्थातच संघर्ष यात्रा असेच असणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन साकार राऊत करणार आहेत. भाजप चित्रपट युनियनचे अध्यक्ष संदीप घुगे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंडेंच्या आयुष्यावर चित्रपट काढण्या मागची भूमिका स्पष्ट करताना घुगे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे खर्या अर्थाने लोकनेते होते. उपेक्षित, दुर्लक्षित घटकांकडे लक्ष देताना सर्वांना बरोबर घेऊन राजकारण करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे अशा नेत्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा खडतर राहिला व त्यातूनच त्यांचे नेतृत्त्व कसे फुलले हे चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न असेल. मुंडेंचा महाविद्यालयीन ते राजकीय प्रवास पडद्यावर दाखविण्यात येईल. मुंडे यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचा विचार मनात आल्यानंतर आम्ही तीन महिने संशोधन केले. मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतरच ही संघर्षयात्रा पडद्यावर आणण्याचे भाजपच्या चित्रपट युनियनने निश्चित केले, असे घुगे यांनी सांगितले.
घुगे पुढे म्हणाले, या चित्रपटासाठी ६ कोटींचे बजेट असून गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेसाठी सुबोध भावे, अतुल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या भूमिकेसाठी योग्य चेहर्याची निवड लवकरच करण्यात येईल.
चित्रपटाचे दिग्दर्शक साकार राऊत म्हणाले, १९९५ साली गोपीनाथ मुंडे यांनी ४० दिवसांची संघर्षयात्रा काढली होती. त्यांच्या या संघर्षयात्रेत त्यांचे जवळचे सहकारी असलेले मुकुंद कुलकर्णी या यात्रेचे साक्षीदार आहेत. त्यांच्याकडून मुंडेंच्या भाषणाचे मुद्दे, बारकावे, भाषणाची लकब, लोकांशी संवाद साधत भाषण करणे आदी बारकावे समजून घेणार आहोत. मुंडे यांच्या भाषणांची व्हिडिओ पाहूनही आम्ही त्यावर संशोधन करीत आहोत.
चित्रपटाच्या लोकेशनसाठी मुंबई, ठाणे, दिल्ली, पुणे, बीड, परळी आदी स्थळांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. मुंडेंचा दिल्लीतील अपघात व संशयास्पद मृत्यूप्रकरणी लोकांची भावना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळेल असे राऊत यांनी स्पष्ट केले.