संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत गेली १५ वर्षे नगरसेविका म्हणून वावरणार्या नेरूळ गावातील नगरसेविका सौ. इंदूमती भगत यांनी गावाच्या व सभोवतालच्या परिसर विकासाकरीता सातत्याने अथक प्रयास केले आहेत. सिडकोचे माजी संचालक व नेरूळ गावचे सुपुत्र नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. इंदूमती भगत यांनी नुकतेच नेरूळ गाव व सभोवतालच्या परिसरासाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून येत्या तीन-चार दिवसात या विकासकामांना शुभारंभ होणार आहे.
सातत्याने तीनदा महापालिकेवर नेरूळ गावातून निवडून जाताना नगरसेविका इंदूमती भगत यांनी नेरूळ गावातील विकासाला सातत्याने चालना दिलेली आहे. सासर व माहेर हे नगरसेविका इंदूमती भगत यांचे नेरूळ गावच असल्याने येथील परिसराच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने चपला झिजविल्या आहेत. पालिका प्रशासनदरबारी हेलपाटे मारले आहेत.
दोन कोटी रूपयांच्या विकासकामांमध्ये २४ लाख ८२ हजार ६६ रूपये खर्च करून नेरूळ गावच्या प्रवेशद्वाराची सुधारणा करणे, १८ लाख ९३ हजार ६२६ रूपये खर्च करून नेरूळ सेक्टर २० येथील भावना स्वीट जवळील पदपथाची सुधारणा करणे, १० लाख ९८ हजार ९६५ रूपये खर्च करून नेरूळ सेक्टर २० येथील सतनाम निवास ते पूनम टॉवरपर्यतच्या पदपथाची दुरूस्ती करणे, २२ लाख ३ हजार २३२ रूपये खर्च करून पूनम टॉवर ते गांवदेवी चौकपर्यतच्या गटाराची दुरूस्ती करणे, १ कोटी २४ लाख ९५ हजार ४८४ रूपये खर्च करून नेरूळची स्मशानभूमी विकसित करणे आदी कामांचा समावेश आहे.
प्रवेशद्वाराची दुरूस्ती, पदपथाची सुधारणा, गटारांची दुरूस्ती, स्मशानभूमी विकसित करणे आदी सर्वसमावेशक जनहिताच्या कामाकरीता नगरसेविका इंदूमती भगत यांनी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून घेतल्याने लवकरच नेरूळ गावचा चेहरामोहरा विकासात्मक स्वरूपात बदललेला पहावयास मिळेल असा आशावाद नेरूळ गावच्या ग्रामस्थांकडून व्यक्त केला जावू लागला आहे.