शरदचंद्र पवार मार्गदर्शन करणार
* कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण
संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधकांना पिछाडीवर टाकत आघाडी घेतली आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेले उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण वाढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर नवी मुंबई कॉंगे्रसतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपिनाथ ठाकूर यांनी दिली आहे.
लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात विकासाची धोरणे यशस्वीपणे राबवून सर्व नागरी सुविधांनी युक्त अशा आधुनिक शहराचा लौकीक नवी मुंबईला प्राप्त करुन दिला आहे. इतर महापालिकांना विकासाच्या बाबतीत मागे टाकून नवी मुंबईने प्रगतीमध्ये मोठी झेप घेतली आहे. या प्रगतीची दखल राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या शहराला मिळालेल्या अनेक पुरस्कारांमधून घेण्यात आली आहे.
एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवडयात पालिकेची निवडणूक अपेक्षित असून त्यादृष्टीने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश भरण्यासाठी दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच लोकनेते गणेश नाईक, संजीव नाईक, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणारे युवा आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांचे नवी मुंबईवर विशेष प्रेम आहे. शहरातील नागरी विकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत म्हणून त्यांनी सदैव सहकार्य केले आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असोत की माथाडी बांधवांसाठी घरांचा प्रश्न असो त्यांनी येथील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त, स्थानिक आणि इतर घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्र्यांसमवेत वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये उपस्थिती दर्शविली आहे. लोकनेते गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी शासनस्तरावर अविरत केलेल्या पाठपुराव्यामुळे अडीच एफएसआयच्या माध्यमातून सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुर्नविकासाला राज्य शासनाने अलिकडेच मंजुरी दिली आहे.
आजच्या मेळाव्यास शरदचंद्र पवार मार्गदर्शन करणार असल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.