* ‘का रे दुरावा फेम’ अभिनेत्री सुरुची आडारकर करणार महिलांचा सन्मान
संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबईतील संकल्प सोशल कल्चरल व वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने रविवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धा, महिला बचत गटाचा मेळावा, महिला शिक्षिकांचा सन्मान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच बरोबर संकल्पच्यावतीने जेष्ठ नागरिकांकरीता आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या २५ व्या सप्ताहाचा सोहळा देखील या दिनी होणार आहे, अशी माहिती संकल्पचे अध्यक्ष विशाल डोळस यांनी दिली.
सी-वूडस, नेरुळ येथील गणेश मैदानात सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यत महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक उपस्थित राहणार आहे. तर महिलांच्या स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यासाठी ‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची आडारकर उपस्थित राहणार आहे.
संकल्प सोशल कल्चरल व वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने नवी मुंबईत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. नेरुळ आणि सिवूडस परिसरात कार्यरत असणार्या या संस्थेने नागरिकांशी एक बांधिलकीचे नाते जोडले आहे. तर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून अनेक युवक-युवतींना रोजगाराच्या वाटा निर्माण करुन दिल्या आहेत. संकल्पचे अध्यक्ष विशाल डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून अखंडीतपणे सुरु असणार्या या उपक्रमाच्या २५ व्या सप्ताहाचा गौरव सोहळा देखील संपन्न होणार आहे. सकाळी ११ ते ३ यावेळेत जेष्ठांचे आरोग्य शिबीर संपन्न होणार आहे. त्याच बरोबर महिला दिनाचे औचित्य साधून सकाळी १० ते ४ यावेळेत महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सायंकाळी ४ ते ७ वेळेत महिला बचत गटाचा मेळावा होणार आहे.सायंकाळी ७ ते ९ यावेळेत महिलांचा हळदी-कुंकू, प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान आणि महिला शिक्षिकांचा व समाजसेविक, जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नेरुळ आणि सिवूडस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विशाल डोळस यांनी केले आहे.