संजय बोरकर
नवी मुंबई : सारसोळे गावातील सारसोळे कोळीवाड्याकडून आयोजित करण्यात आलेली कोळीवाड्यातील होळी मैदानावरील मध्यरात्री १२ वाजता पेटविली जाणारी होळी आजही रात्री बरोबर १२च्या ठोक्यालाच पेटविण्यात आली. गेल्या काही वर्षात नवी मुंबईकरांसाठी सारसोळेच्या कोळी वाड्याची रात्री १२च्या ठोक्यालाच पेटणारी होळी ही आकर्षणाची बाब बनली आहे.
सारसोळे गावची होळी ही नवी मुंबईकरांमध्ये फार पूर्वीपासून चर्चेचा व श्रध्देचा विषय. खूप वर्षापासून होळी मैदानावर सारसोळेच्या कोळीवाड्याकडून मध्यरात्री १२ वाजता होळीचे आयोजन करण्यात येत आहे. सारसोळे कोळीवाड्यातील होळी ग्रामस्थ एकत्रित येवून उत्साहात, जल्लोषात व श्रध्दाभावाने आयोजित करत असतात. अलिकडच्या काही वर्षापासून सारसोळेच्या युवा ग्रामस्थांकडून केली जाणारी होळीची सजावटही लक्षणीय ठरली आहे. होळीला पूर्णपणे फुलांनी आच्छादित केलेले असते. होळी पेटविताना सारसोळेच्या ग्रामस्थांच्या चेहर्यावरील आनंद हा पाहण्यासारखा असतो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सारसोळे कोळीवाड्यातील होळी पूर्णपणे फुलांनी आच्छादित करण्यात आली होती. यंदा कोळीवाड्यात सारसोळेच्या ग्रामस्थांची झालेली गर्दी लक्षवेधी होती. ग्रामस्थांच्या चेहर्यावरील आनंद ओंसडूंन वाहत होता. लहान मुले होळीवरील झेंडूची फुले काढून एकमेकांच्या आनंदावर उधळीत जल्लोष साजरा करत होती. या होळीला नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, नवी मुंबई भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील होनराव, कुकशेत गावचे नगरसेवक सुरज पाटील, समाजसेवक प्रल्हाद पाटील, शाखाप्रमुख मनोज तांडेल आदींनी भेट दिली. होळी महोत्सवाच्या आयोजनात ग्रामस्थांसमवेत कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले. सारसोळे कोळीवाड्यातील होळी पेटविण्याचा मान मढवी परिवाराचा असल्याने भाऊ मढवी यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.