अनंतकुमार गवई
नवी मुंबई : प्रशासनाच्या व राजकारण्यांच्या उदासिनतेमुळे विकासापासून आणि नागरी सुविधांपासून इतरांच्या तुलनेत काही अंशी पिछाडीवर असणारे नवी मुंबईच्या नकाशावरील सारसोळे गाव. या गावातील सारसोळे कोळीवाड्याकडून आयोजित करण्यात येणारी कोळीवाड्यातील होळी मैदानावरील मध्यरात्री १२ वाजता पेटविली जाणारी होळी आजही नवी मुंबईकरांसाठी आकर्षणाची बाब आहे.
सारसोळे गाव हे नवी मुंबईतील पुरातन गाव असले तरी अलिकडच्या काळात गावातील मनोज मेहेर या युवकाने गेल्या ७ वर्षात बामणदेव मार्ग, जेटीची दुर्रावस्था, जेटीवरील अंधार, जेटीवरील असुरक्षितता यासह अन्य गावाच्या समस्यांबाबत प्रशासनदरबारी केलेला पाठपुरावा, झिजविलेल्या चपला आणि जनता दरबारासह मंत्रालयात जावून गावाच्या विकासासाठी प्रस्थापित मातब्बरांशी केलेला सघर्ष यामुळे नवी मुंबईकरांनाही एव्हाना सारसोळे गाव चांगलेच परिचयाच्या झालेले आहे.
सारसोळे गावची होळी ही नवी मुंबईकरांमध्ये फार पूर्वीपासून चर्चेचा व श्रध्देचा विषय. खूप वर्षापासून होळी मैदानावर सारसोळेच्या कोळीवाड्याकडून मध्यरात्री १२ वाजता होळीचे आयोजन करण्यात येत आहे. सारसोळे कोळीवाड्यातील होळी ग्रामस्थ एकत्रित येवून उत्साहात, जल्लोषात व श्रध्दाभावाने आयोजित करत असतात. अलिकडच्या काही वर्षापासून सारसोळेच्या युवा ग्रामस्थांकडून केली जाणारी होळीची सजावटही लक्षणीय ठरली आहे. होळीला पूर्णपणे फुलांनी आच्छादित केलेले असते. होळी पेटविताना सारसोळेच्या ग्रामस्थांच्या चेहर्यावरील आनंद हा पाहण्यासारखा असतो.
सारसोळेचे ग्रामस्थ श्रध्दाभावाने या होळीचे दरवर्षी आयोजन करत असल्याने नवी मुंबईकरांनी गुरूवारी रात्री १२ वाजता मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी केले आहे.