संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : घणसोली कॉलनीवासियांना नागरी सुविधांसाठी आजही प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असून घणसोली कॉलनीतील सेक्टर ९ परिसरात घरौंदा वसाहतीकडे जाताना रस्त्यावर ठिकठिकाणी विखुरलेला कचरा रोगराईला निमत्रंण देत असल्याची टीका मनसेचे शहरसचिव व घरौंदातील रहीवाशी संदीप गलुगडे यांनी केली आहे.
घणसोली कॉलनी नोड हस्तांतरणाच्या वादामुळे सिडको व नवी मुंबई महापालिका प्रशासनात सावळागोंधळ असून यात नाहक घणसोली कॉलनीतील रहीवाशी भरडले जात असल्याची जळजळीत टीका गलुगडे यांनी केली आहे.
नागरी सुविधा व नागरी समस्या याबाबतीत सिडको व महापालिका परस्परांवर जबाबदारी ढकलत आहे. घणसोली कॉलनीतील रहीवाशांना नागरी सुविधा मिळाव्यात व नागरी समस्यांचे निवारण व्हावे याकरीता संदीप गलुगडे यांनी घणसोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. घणसोलीच्या तत्कालीन विभाग अधिकार्यांनी पाहणी अभियानाचे लेखी आश्वासन देवून प्रस्थापित राजकारण्यांच्या आश्वासनामुळे ते आश्वासन विभाग अधिकार्यांनी पाळले नाही. त्यामुळे गलुगडे यांनी घणसोली पालिका विभाग कार्यालयालाच टाळे ठोकून घणसोली कॉलनीतील नागरी समस्यांकडे व असुविधांकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधण्याचा प्रयास केला होता.
घणसोली कॉलनीतील कचरा वेळेवर उचलला जात नसून रस्त्यारस्त्यावर पडलेला असल्याचे व त्यातून निर्माण होणार्या दुर्गंधीमुळे घरौंदावासियांच्या आरोग्याला पर्यायाने जिविताला धोका निर्माण झाल्याचे संदीप गलुगडे यांनी पालिका प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून देण्याचा प्रयास केला आहे.
रविवारी (दि. ८ मार्च) घणसोली कॉलनीतील घरौंदा भागात नाल्यावरील पुलावरील रस्त्यावरच कचरा विखुरल्याचे व त्यापुढे स्टेशनरोडला गेल्यास चौकातच संपूर्ण रस्त्यावर कचरा विखुरल्याचे संदीप गलुगडे यांनी दाखवून दिले. घणसोली कॉलनीतील घरौंदावासियांच्या नागरी सुविधांसाठी व नागरी समस्या निवारणासाठी सातत्याने पाठपुरावा करत असलेले संदीप गलुगडे घणसोली कॉलनीवासियांना जवळून पहावयास मिळाले आहेत.