संदीप खांडगेपाटील : 8082097775
निवडणूक महासंग्राम – भाग 1
नवी मुंबई : मतदारसंघ पुर्नरचनेमुळे आणि आरक्षणामुळे काही मतदारसंघात होत्याचे नव्हते झाल्याने प्रस्थापितांसह अनेक मातब्बर इच्छूकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहे. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील सोसायट्या मिळून बनलेला प्रभाग 86 हा अनुसूचित महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने प्रस्थापितांसह अनेक मातब्बर इच्छूकांच्या भावी राजकारणाला मर्यादा पडल्या आहेत. सारसोळे जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकून देण्यात सुरज पाटील यशस्वी ठरतात अथवा सारसोळेच्या खेळपट्टीवर दमदार खेळी करत कार्यसम्राट नारायण पाटील शिवसेनेत आपला प्रभाव निर्माण करतात याकडे नेरूळवासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
पूर्वीचा 69 असणार्या प्रभागाचे मतदारसंघ पुनर्रचनेत काही अंशी विभाजन होवून प्रभाग 85 व 86 असे दोन प्रभाग निर्माण झाले. सिडकोच्या दोन सोसायट्या, टॉवर आणि गावठाणचा भाग मिळून काही भाग कुकशेतला जोडण्यात आला व त्यातून प्रभाग 85 हा नव्याने जन्माला आला. सारसोळे गाव, सिडकोच्या पाच सोसायट्या आणि गावठाणातील गृहनिर्माण सोसायट्या मिळून प्रभाग 86 हा प्रभाग बनला. हा प्रभाग अनुसूचित महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने प्रस्थापित मातब्बरांना कुकशेत प्रभागाचा आधार घ्यावा लागला. सारसोळे गावातील मातब्बर इच्छूकांच्या राजकीय महत्वाकांक्षांना गुंडाळून आता पुन्हा समाजकारणाचा आधार घ्यावा लागणार आहे.
सारसोळे गावातून सलग 15 वर्षे नारायण पाटील यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा विभाग हा गेल्या पाच वर्षात नेरूळ नोडलाच नाही तर नवी मुंबईलादेखील चांगलाच परिचयाचा झालेला आहे. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील नागरी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक भागातील कोलवानी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी महापालिका, सिडको, पोलीस मुख्यालय, मंत्रालय, नेरूळ पोलीस ठाणे, नेरूळ विभाग अधिकारी, पालकमंत्र्यांचा जनता दरबार आदी ठिकाणी संघर्ष करून आपला परिसर नावारूपाला आणला.
गतपाच वर्षात मनोज मेहेरच्या परिश्रमामुळे व सातत्याने सोडवित असलेल्या नागरी समस्यांमुळे मनोज मेहेर हमखास आगामी निवडणूकीत नगरसेवक बनणार अशी मतदारांनीदेखील मनाशी खूणगाठ बांधली होती. नगरसेवक नारायण पाटील आणि मनोज मेहेर यांच्यातच राजकीय झुंज होणार असल्याचे चित्र एव्हाना स्पष्टही झाले होते. शिवसेना शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांनी अधूनमधून करिश्मा दाखवित शिवसेनेचे व स्वत:चे अस्तित्व दाखविण्याचा प्रयास केला.
प्रभाग अनुसूचित महिला राखीव झाल्याने अनेकांची राजकीय गणिते बिघडली आहेत. त्यातच नगरसेवक नारायण पाटील व त्यांच्या परिवाराने शिवसेनेत प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आहे. कुकशेत व सारसोळे गाव आणि सेक्टर सहा मिळून बनलेल्या प्रभाग 85 मधून शिवसेनेच्या तिकीटावर नारायण पाटील यांच्या सूनबाई सौ. समुद्रा प्रल्हाद पाटील निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनुसूचित महिला प्रभागाकरीता स्थानिक उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची दमछाक झालेली आहे. या प्रभागावर नारायण पाटील यांनी 15 वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्याने हा प्रभाग शिवसेना जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. नारायण पाटील यांनी शिवसेनेत जाताच कुकशेतचे नगरसेवक सुरज पाटील यांनी या प्रभागावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे गेल्या काही दिवसातील घडमोडीदरम्यान व उघड होणार्या बैठकीदरम्यान स्पष्ट होणार आहे. सुरज पाटील आज स्वारस्य दाखवित असले तरी उद्या ते स्वत: नेरूळ गाव आणि सेक्टर 10च्या काही गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या प्रभागातून उभे राहणार असून त्यांची पत्नी कुकशेत गाव प्रभागातून निवडणूकीत नशिब आजमावणार आहेत.
नारायण पाटील हे स्वत: सारसोळे गावचे ग्रामस्थ असून 15 वर्षे नगरसेवक म्हणून काम करताना त्यांची स्वत:ची या मतदारसंघातील मोर्चेबांधणी चांगली आहे. अधिकांश मतदारांशी त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. सारसोळे प्रभागातून नारायण पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला सुरूंग लावण्याच्या वल्गना आज अनेक घटक करून लागले असले तरी ते तितके सोपे नसल्याचे स्थानिक रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. उमेदवार कोणताही असला तरी सारसोळे अनुसूचित महिला आरक्षित प्रभागातील लढत खर्या ही नारायण पाटील व सुरज पाटील यांच्यातच होणार असल्याचे चित्र पहिल्या टप्प्यात निर्माण झाले आहे.