आमदार संदीप नाईक यांच्या तारांकित प्रश्नाला कामगारमंत्री प्रकाश मेहता यांचे उत्तर
सुजित शिंदे ़: 9619197444
नवी मुंबई : कष्टकरी माथाडी कामगारांना हक्काची घरे लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी चालू विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न विचारला होता. या तारांकित प्रश्नाला कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी लेखी उत्तर दिले असून माथाडी कामगारांना सिडको मार्फत घरे देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे या उत्तरामध्ये नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर आस्थापनामध्ये मोठया संख्येने माथाडी कामगार कार्यरत आहेत. या कामगारांच्या न्याय आणि हक्कासाठी आमदार संदीप नाईक यांनी विधानसभेमध्ये वेळोवेळी आवाज उठविला आहे. नवी मुंबई क्षेत्रात माथाडी कामगारांसाठी बांधण्यात आलेली घरे अद्याप त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाहीत. हे खरे आहे
काय? असा सवाल उपस्थित करुन आमदार नाईक यांनी संबंधित घरे माथाडी कामगारांना उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावरुन कोणती कार्यवाही करण्यात आली आहे अथवा येत आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर दिलेल्या लेखी उत्तरामध्ये मंत्री प्रकाश मेहता यांनी नमूद केले आहे की माथाडी कामगारांसाठी नवी मुंबई क्षेत्रात बांधलेल्या एकूण 9192 घरांचे वाटप सिडकोच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. या घरांचे वाटप 1978 ते 2011 या कालावधीमध्ये झालेले आहे. शासनाच्या अधीनस्त मुंबई विभागात एकूण 7 माथाडी मंडळ आहेत. नगरविकास विभागाच्या 20.06.2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार
कामगार मंडळामध्ये नोंद असलेल्या अर्जदार कामगारांचे दाखले या मंडळामार्फत देण्यात आले आहेत. हे अर्ज सिडकोला सादर करण्यात आले आहेत. आलेल्या अर्जामधून माथाडी कामगारांना घरे वाटप करण्याची कार्यवाही सिडकोमार्फत माथाडी मंडळाच्या स्तरावरुन सुरु असल्याची माहिती कामगारमंत्री मेहता यांनी लेखी उत्तरामध्ये दिली आहे.