संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : आयुष्यभर जनसेवा करताना निस्वार्थीपणेच केलेली असल्यामुळे लोकांचे प्रेम आजही माझ्यावर कायम आहे. लोकांचे प्रेम हीच माझी खरी संपत्ती असून लोकसभा-विधानसभा निवडणूकीनंतर रहीवाशांना खरी परिस्थिती कळून चुकलेली आहे. जनता पुन्हा एकवार भुलभुलैय्याच्या मागे न धावता विकासकामांवरच विश्वास ठेवत असल्यामुळे महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस 70 जागा जिंकणार असल्याचा विश्वास लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात प्रभाग क्रं. 85-86च्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर गणेश नाईक मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमात मनसेचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नेरूळ सेक्टर 2-4 येथे असणार्या महापालिकेच्या स्मशानभूमीचे शांतीधाम सारसोळे स्मशानभूमी नामकरण करण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका घेणार्या लोकनेते गणेश नाईक यांचा कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर व युवा ग्रामस्थांनी जाहीर सत्कार केला. यावेळी कुकशेतचे नगरसेवक सुरज पाटील यांच्या विकासकामांवर आधारित तथास्तु ग्रुपच्यावतीने पथनाट्यातून आढावा घेण्यात आला.
लोकनेते गणेश नाईक यांनी आपल्या भाषणातून मालमत्ता कर, मोरबे धरणाच्या माध्यमातून पाण्याची सुबत्ता याचा आढावा घेत विधानसभा निवडणूकीच्या वादळात आपण जेमेतेम मतांनी पराभूत झाल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणूकीनंतर पुलाखालुन बरेच राजकीय पाणी वाहून गेल्याने नवी मुंबईकरांचा राजकीय भ्रमनिरास झाला आहे. सत्य हे शाश्वत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच नवी मुंबईत विकासकामे करण्यास सक्षम असल्याचा प्रत्यय नवी मुंबईकरांना आलेला असल्याने आगामी निवडणूकीत 111 जागांपैकी किमान 70 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होणार असल्याचा विश्वास लोकनेते गणेश नाईक यांनी यावेळी बोलून दाखविला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे यांनी घणाघाती भाषण करत सध्या विभागात सुरू असलेल्या राजकीय घटनाक्रमाचा आढावा घेत या दोन्ही प्रभागातून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. एक भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत आपण कायम सोबत राहणार असल्याचे टाव्हरे यांनी यावेळी निक्षून सांगितले. नगरसेवक सुरज पाटील यांनी कुकशेत व सारसोळे गावातील विकासकामांचा तुलनात्मक आढावा आपल्या भाषणातून घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी अशोक आतकरी, स्थानिक वॉर्ड अध्यक्ष यशवंत तांडेल, तुकाराम टाव्हरे, रमेश म्हसके, ज्ञानेश्वर विश्वासराव, डॉ. दत्तात्रय आगदे , संदेश उघाडे व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.