संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : सर्वच राजकीय पक्षांमध्ये नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची लगबग व जय्यत तयारी सुरू आहे. कालपरवा नवी मुंबईत कोणाच्या ध्यानीमनी नसलेला शेकाप किमान काही जागा जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने निवडणूक रिंगणात उतरला आहे. मात्र निवडणूक लढविण्याविषयी दादरच्या गडावरून तसेच कृष्णकुंजवरून कोणतेही आदेश न आल्याने मनसैनिकांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले आहे.
शिवसेनेच्या इच्छूकांच्या मुलाखली झाल्या असून काँग्रेस पक्षातील इच्छूकांच्या मुलाखतींना उद्या सुरूवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित झाल्यातच जमा आहे. शेकाप पक्षाच्या प्रचारासाठी शेकापचे सर्वेसर्वा व माजी आमदार विवेक पाटील नवी मुंबईत कार्यकर्त्यांसमवेत दुचाकी फिरवू लागले आहेत. मात्र एकेकाळी जनआंदोलनाच्या माध्यमातून मिडीयामध्ये हेवीवेट ठरलेली नवी मुंबईतील मनसे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर थंडगार झाल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पदरी पडलेल्या दारूण अपयशानंतर शहर अध्यक्ष गजाजन काळेंच्या नेतृत्वाखाली मनसे नव्याने कात टाकण्याचा प्रयास करू लागली आहे. अधिकांश प्रभागातले कार्यकर्ते व पदाधिकारी निवडणूक लढवून आपला स्थानिक भागातील जनाधार आजमावण्यासाठी सज्ज झाले आहे. मनसेची जनसंपर्क कार्यालये उघडण्यास सुरूवात झालेली आहे. परंतु अन्य पक्षाच्या मुख्यालयातील जल्लोष व उत्साह मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पहावयास मिळत नाही. मनसेचे स्थानिक भागातील नेतेमंडळी व पदाधिकारी निवडणूक लढविण्याबाबत कृष्णकुंजपासून दादरच्या राजगडपर्यत निवडणूक लढविण्याविषयी पाठपुरावा करत असले तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पक्षासाठी अनेक वर्षे जीव तोडून काम केले आहे. घरचे पैसे टाकून जनआंदोलने केली आहेत. पक्षासाठी केसेेस अंगावर घेतल्या आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत उपाशीपोटी पक्षासाठी काम केले आहे. आता महापालिका निवडणूकीत आमचे नशिब आजमावयची वेळ आलेली असताना पक्षाचे नेतेमंडळी थंड का बसली आहेत, असा संतप्त सवाल मनसैनिकांकडून उघडपणे विचारला जात आहे. महापालिका निवडणूक आता जेमतेम एक महिन्यावरच आलेली असताना मनसेची भूमिका स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ निर्माण झालेली आहे. अन्य पक्षातील इच्छूकांनी आपले तिकीट निश्चित झाल्याचे गृहीत धरून प्रभाग दोन ते तीन वेळा घरटी पिंजून काढत आघाडी घेतली असली तरी मनसैनिकांना आपला पक्ष निवडणूक लढविणार अथवा नाही याबाबत काहीही माहिती नाही. मनसेने महापालिका निवडणूक सहभागाविषयी लवकर निर्णय न घेतल्यास मनसेतील उरलेसुरले मातब्बर कार्यकर्ते दुसर्या ठिकाणी घरोबा करण्याची भीती मनसेच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.