संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : राजकारणात एकाच घरातील सदस्य महापालिका सभागृहात असणे ही बाब नवी मुंबईकरांसाठी नवीन नाही. काका-पुतणे, आई-मुलगी, पती-पत्नी अशा स्वरूपात एकाच घरातील सदस्य महापालिका स्थापनेपासून सभागृहात वावरताना नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळाले आहे. पण नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सभागृहात निवडणूकीनंतर विद्यमान उपमहापौर अशोक गावडे व त्यांची उच्चविद्याविभूषित कन्या अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड सभागृहात दिसण्याची दाट शक्यता आहे. सभागृहात पिता-कन्या वावरण्याची ही नवी मुंबई महापालिकेच्या राजकारणातील पहिलीच घटना असणार आहे.
नवी मुंबईच्या राजकारणात सक्रिय असणारे उपमहापौर अशोक गावडे राज्याच्या सहकार क्षेत्रात एक मुरब्बी सहकार तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तसेच सहकाराच्या विविध क्षेत्रातील योगदानामुळे अशोक गावडे हे राज्याच्या सहकारक्षेत्रात परिचित असे नाव आहे. नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर अशोक गावडे यांच्या पूर्वीच्या 88 या प्रभागाचे प्रभाग पुनर्रचनेत दोन प्रभाग झाले. प्रभाग क्रं. 98 व 109 असे नवीन प्रभाग निर्माण झाले. प्रभाग क्रं.109 मधून स्वत: अशोक गावडे पुन्हा एकवार आपले नशिब आजमावणार असून प्रभाग 98 मध्ये गावडे यांची दोन नंबरची कन्या अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड आपले राजकीय नशिब आजमावणार आहेत.
केवळ उपमहापौरांची कन्या म्हणून अॅड. सपना गावडे-गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट देणार नसून तर पक्षसंघटनेतील त्यांचे गत 10 वर्षातील योगदान व सामाजिक कामे, जनसेवा आणि उच्चविद्याविभूषित या निकषावर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात येत आहे. सपना गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेच्या तिसर्याच सभागृहात जाण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण निवडणूक लढविण्यासाठी वयोमर्यादा अवघ्या काही दिवसांची कमी पडल्याने ऐन मोक्याच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशोक गावडे यांच्या पत्नी सौ. निर्मला गावडे यांना उमेदवारी देण्यात आली. सपना गावडे यांनी 2005 ते 2010 या पाच वर्षात स्वतंत्र प्रभागावर लक्ष केंद्रीत करत सीवूड्स भागात जोरदार मोर्चेबांधणी करत जनसंपर्क वाढविला. सामाजिक उपक्रमातून जनसेवा करत आपला ठसा सिवूडस भागात निर्माण केला. पण ऐन मोक्याच्या क्षणी भाजपातून भरत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने 2010 सालच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सपना गावडेंना डावलण्यात आले. कधी नशिबाने तर कधी राजकीय अपरिहार्यतेने हुलकावणी दिली तरी सपना गावडेंनी आपले पक्षसंघटनात्मक कार्य हिरीरीने पुढे चालवित सामाजिक उपक्रम व जनसेवा यात खंड पडू दिला नाही.
पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर अशोक गावडे यांच्या प्रभागाचे विभाजन होवून दोन प्रभाग झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा अॅड. सपना गावडे-गायकवाड यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अॅड. सपना गावडे-गायकवाड हे निवडणूक लढवू पाहणार्या प्रभाग 98ची लोकसंख्या 9983 आहे तर उपमहापौर अशोक गावडे हे निवडणूक लढवू पाहणार्या प्रभाग 109ची लोकसंख्या 9431 आहे. प्रभाग 98 मध्ये नेरूळ सेक्टर 22, 26, 28,30,32, 40, 42 या परिसराचा समावेश होत असून प्रभाग 109 मध्ये नेरुळ सेक्टर 38, 42 ए, 48ए, 44चा काही भाग या परिसराचा समावेश होत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणूकीनंतर राजकीय समीकरणात होत असलेला बदल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याचे संकेत दिसू लागले आहेत. प्रभाग 98 व प्रभाग 109 या दोन्ही प्रभागातून गेली 10 वर्षे सुरूवातीला सौ. निर्मला गावडे आणि त्यानंतर अशोक गावडे यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केलेले आहे. या दोन्ही प्रभागात गावडे परिवाराचा घरटी जनसंपर्क आहे.
निवडणूका कधीही जाहीर होवू द्या, मतदानाची तारीख कोणतीही असू द्या. उपमहापौर अशोक गावडे आणि अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड यांचा विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून व कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गावडे पिता-कन्येने निवडणूकीकरता गेल्या काही महिन्यापासून जय्यत मोर्चेबांधणी करत घरटी जनसंपर्क वाढविला आहे. उपमहापौर अशोक गावडे यांनी महापालिका प्रशासनाच्या माध्यातून विविध विकासकामे केली आहे. सिडकोच्या अविकसित भुखंडाचा बकालपणाबाबत गावडेंनी सिडको ते मंत्रालय पाठपुरावा करूनही प्रशासनाने उदासिनता दाखविली. रहीवाशांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून अशोक गावडेंनी स्वखर्चांने या सिडकोच्या भुखंडांची साफसफाई करून घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन जागांवर हमखास विजय गृहीत धरला जात असल्याने अशोक गावडे व अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड ही बापलेकींची जोडी महापालिकेच्या आगामी सभागृहात नवी मुंबईकरांना वावरताना पहावयास मिळेल!