संजय बोरकर – 9869966614
नवी मुंबई :- शिवसेना पक्षाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुखपद सध्या रिक्तच आहे. विजय चौगुले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद आजही रिक्तच आहे. महापालिका निवडणूका झाल्याशिवाय जिल्हाप्रमुख पदाचा निर्णय होणार नसल्याने नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना जिल्हाप्रमुखाविना लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्यंतरीच्या काळात वादंग निर्माण झाल्याने विजय चौगुलेंनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. या पदाकरीता उपनेते विजय नाहटापासून उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, विजय माने, मनोज हळदणकर आदी नावांची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळापासून चावडी गप्पांपर्यत सुरुच होती. शिवसेनेने महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपनेते विजय नाहटा यांची समिती बनविली आहे. रविवारीच शिवसेनेकडून निवडणूक लढवू पाहणार्या इच्छूकांच्या मुलाखतीचा कार्यक्रमदेखील पार पडलेला आहे. अन्य पक्षातून शिवसेनेत सध्या जोरदार मातब्बर राजकीय प्रस्थांचे इनकमिंग सुरू आहे.
शिवसेनेला प्रथमच प्रभावीरित्या अनुकूल वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विजय चौगुले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी संघटनेवर स्थानिक पातळीवर चौगुलेंचेच अद्यापि एकहाती वर्चस्व असल्याचे विविध कार्यक्रमादरम्यान पहावयास मिळत आहे. महापालिका निवडणूका होईपर्यत जिल्हाप्रमुख पदाविषयी कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे मातोश्रीवरूनच सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.