संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : निवडणूका जवळ आल्यावर आयाराम-गयारामचे पर्व जोरदारपणे सुरू होेते. अवघ्या महिनाभरावर येवून ठेपलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोनकोडेचे कडवट निष्ठावंतच बोनकोडेला पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करू लागल्याने राजकारणाला वेगळे वळण येवू लागले आहे. ऐरोलीतील कट्टर बोनकोडे समर्थक एम.के.मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला. काल वाशी सेक्टर 17 मधील बोनकोडेचे निष्ठावंत कडवट समर्थक संपत शेवाळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. बदलत्या राजकीय समीकरणामुळे वाशी सेक्टर 17 या महापालिका प्रभागात प्रथमच भाजपाचे कमळ फुलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
प्रभाग पुनर्रचनेत वाशी सेक्टर 17 परिसरात माजी उपमहापौर व बोनकोडेचे कडवट अनुयायी भरत नखाते यांच्या प्रभागाचा काही भाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत शेवाळे यांच्या प्रभागात विलीन झाला. प्रभाग पुनर्रचनेतील गोंधळामुळे या प्रभागावर भरत नखातेंनीही दावा केल्याने नखाते व शेवाळे वादात लोकनेते गणेश नाईक कोणाला गोंजारणार व कोणाची समजूूत काढणार याकडे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले होते. तथापि अचानक संपत शेवाळे यांनी भाजपात प्रवेश केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
संपत शेवाळे हे प्रारंभापासून लोकनेते गणेश नाईक यांचे अनुयायी. गणेशोत्सवामधील गणरायाच्या आरतीमध्ये समस्त नाईक परिवाराची उपस्थिती हा त्यांचा आग्रह नाईक परिवारानेदेखील आजवर मान्य केला. स्थायी समिती सभापतीपदाकरीता अशोक गावडे प्रबळ दावेदार असतानाही बोनकोडेने शेवाळेंनाच सभापतीपदाची सूत्रे दिली होती. प्रभाग पुर्नरचनेतील विभाजनानंतर वाशी सेक्टर 17 परिसरात भरत नखातेंचे लागलेले होर्डींग राजकीय वादळाची चाहूल स्पष्ट करणारे होते.
शेवाळे व नखाते हे दोन्ही आपल्याच घरातील सदस्य असल्याने त्यांची समजूत काढणे अवघड नसल्याचे बोनकोडेतील सूत्रांकडून सांगण्यात येत होेते. विधानसभा निवडणूकीत या परिसरातून भाजपाला दणदणीत मतदान झाल्याने हा प्रभाग पालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुरक्षित राहणार नसल्याचे संकेत तेव्हाच प्राप्त झाले होते. शेवाळे यांच्या राजकीय कोलांटउडीमुळे वाशी सेक्टर 17 परिसर प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसकरता प्रतिष्ठेची बाब बनला आहे. वाशी सेक्टर 17 परिसराची राजकीय धुरा बोनकोडेदरबारी वाहणार्या राम विचारेंच्या कर्तृत्वालादेखील पालिका निवडणूकीच्या माध्यमातून आवाहन निर्माण झाले आहे. उद्या वेळ पडल्यास ही जागा जिंकण्यासाठी मतदारसंघातील गुजराती भाषिकांची संख्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेस भरत नखातेंऐवजी शिक्षण मंडळाचे माजी सभापती दिनेश कानानी अथवा एकाद्या मातब्बर गुजराथी उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रभाग महिलांकरीता आरक्षित झाला असला तरी या पालिका निवडणूकीत स्थानिक पातळीवर भरत नखाते व संपत शेवाळे या रथी-महारथींची प्रतिष्ठा पणाला लागलेली पहावयास मिळत आहे.