संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील काही प्रभागातील सिमाकंनावरून सुरू झालेले राजकीय वादळ शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून गुरूवारी रणरणत्या उन्हात सिमाकंनावर आक्षेप घेणार्या आंदोलकांचा उत्साह कायम असल्याचे पहावयास मिळाले. तथापि जनआंदोलनाच्या नावाखाली होत असलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणादरम्यान जनता कमी व राष्ट्रवादी काँगे्रसचेच घटक अधिक पहावयास मिळाले.
नेरूळ गाव आणि सेक्टर 10 या दरम्यान विभागल्या गेलेल्या तीन महापालिका प्रभागातील गृहनिर्मा सोसायट्यांच्या समावेशावरून राजकीय कलह निर्माण सुरू झालेला आहे. महापालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 7 फेब्रुवारी 2015 रोजी प्रभाग रचना जाहीर केली होती. त्या प्रभाग रचनेला प्रभाग काही स्थानिकांनी आक्षेप घेतले. त्या आक्षेपाची प्रभाग 93,94,95 बाबत दखल घेत व भौगोलिक पुनर्रचनेचा विचार करत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने 13 मार्च 2015 रोजी सुधारीत प्रभाग रचना व सिमाकंन जाहीर केले. त्यानंतर नेरूळच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. सुधारीत प्रभाग रचना सिमाकंनावरून नेरूळ गावातील व नेरूळ सेक्टर 10 परिसरातील राजकीय समीकरणात बदल झाल्याने काही राजकीय घटकांच्या संभाव्य समीकरणाला तडा गेला. त्यातूनच पत्रकार परिषदा, घरोघरी पत्रके आदी प्रकार घडत गेले.
या सुधारीत प्रभाग सिमाकंनाच्या बदलाला आक्षेप घेत नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणार्या युवा नगरसेवक सुरज पाटील यांनी याविरोधात हालचाली करत प्रशासनाला धारेवर धरले आहे. राजकीय दबावामुळे हा सुधारीत बदल झाल्याचा आरोप करत सुरज पाटील यांनी जनआंदोलनाला सुरूवात केली. गुरूवारी पामबीच मार्गावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सकाळपासून सुरू झाले असून या उपोषणात सुरज पाटील यांच्यासमवेत सौ. सुजाता सुरज पाटील, राजेश भोर, अनिल लोखंडे, अशोक आतकरी, मिलिंद पाटील, भास्कर यमगर आदी मंडळी सहभागी झाली आहेत. या उपोषणात स्थानिक भागातील जनसामान्यांपेक्षा राजकीय वर्तुळातीलच चेहरे अधिकांश प्रमाणात पहावयास मिळाले.
रणरणत्या उन्हातही आंदोलकांचा उत्साह कायम होता. महापालिका प्रशासनाच्या व निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. सुरज पाटील यांनी पालिका प्रशासन व निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनाला शुभेच्छा देण्याकरीता सिवूड्समधील भाजपातील मंडळीदेखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले.