नवी मुंबई : नेरूळवासियांना सतत काहीतरी भरीव विधायक स्वरूपात मदत करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या नामदेव भगत व त्यांच्या परिवाराने मोफत आरोग्य विमा, गोरगरीबांकरीता निवास सुविधा आदी योजनांना मूर्त स्वरूप देतानाच नेरूळ नोडमधील प्रत्येकालाच घरबसल्या इंटरनेट सुविधा मोफत मिळण्याकरीता क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. गुढीपाडव्यापासून नेरूळवासियांना हातातील भ्रमणध्वनीमध्ये, घरातील संगणक असो वा लॅपटॉप सर्वांमध्ये वाय-फाय सुविधेच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रतिक भगत यांनी दिली.
आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत व नेरूळ गावच्या नगरसेविका सौ. इंदूमती भगत यांनी गतकाही वर्षात सातत्याने नेरूळवासियांकरता सामाजिक योगदान देत विविध उपक्रम राबविले आहे. नेरूळवासियांकरता मोफत आरोग्य विमा, गोरगरीबांकरता गृहनिर्माण प्रकल्प, आदेश बांदेकरांच्या खेळ मांडियेला कार्यक्रमाचे आयोजन, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांचा धडाका नामदेव भगत यांनी राजकीय क्षेत्रातील मातब्बरांची झोप उडविली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रतिक भगत यांच्या संकल्पनेतून आई वत्सला प्रतिष्ठानच्या संयुक्त माध्यमातून नेरूळवासियांना वाय-फाय सुविधेच्या माध्यमातून घरबसल्या मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या वायफाय सुविधेचा स्पीड 72 एमबीपीस असल्याने रहीवाशांना मोबाईल अथवा लॅपटॉपवर इंटरनेट सुविधा घेताना कोणताही अडथळा जाणवणार नाही. आपण घरात अथवा घराबाहेर मोफत इंटरनेट सुविधेचा 24 तास घेवू शकतील. वाय-फाय सुविधेच्या माध्यमातून नेरूळ नोडमधील किमान एकाच वेळी 70 हजार रहीवाशी एकाचवेळी लाभ घेवू शकणार असल्याची माहिती प्रतिक भगत यांनी सांगितले. या सुविधेमुळे रहीवाशांना हातातील भ्रमणध्वनी, घरातील लॅपटॉप व संगणकाला मोफत इंटरनेटसुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या नेरूळ सेक्टर 20 येथील जनसंपर्क कार्यालयात येवून आयपी अॅड्रेस, लॉगिन अँड्रेस व पासवर्ड याबाबतची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन या योजनेचे आयोजक प्रतिक भगत यांनी दिली आहे.