मुंबई: सुशिक्षित आणि सुसंस्कृतांचे राज्य अशी ओळख असणारा महाराष्ट्र बलात्कारांची राजधानी बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्कार आणि विनयभंगाच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद गेल्या वर्षात महाराष्ट्रात झाल्याची माहिती केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी दिली.
लोकसभेत मनेका गांधी यांनी लेखी उत्तरातून देशात महिलांवर होणार्या अत्याचारांचा लेखाजोखा मांडला त्यात महाराष्ट्रातील क्राइम रेटसर्वाधिक असल्याचं स्पष्ट झालं.
2014 साली महाराष्ट्रात बलात्कार आणि विनयभंगाच्या 13 हजार 827 तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशात 13 हजार 323 तक्रारींची नोंद झाली. महिलांवरील अत्याचारांत आंध्र प्रदेश तिसर्या क्रमांकावर असून तिथं 13 हजार 267 तक्रारी दाखल झाल्याचे मनेका गांधी यांनी सांगितलं.
मुंबईतही महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे 2013च्या तुलनेत 2014 सालात वाढले. 2013 सालात दोन हजार 934 गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये 616 गुन्ह्यांनी वाढ होऊन 2014मध्ये तीन हजार 550 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये बलात्काराचे 610, अपहरणाचे 309 यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.