नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बेशिस्तपणा, बेजबाबदारपणा, कामचुकारपणा अजिबात चालत नाही. कामात हयगय करणार्यांचे कान उपटून ते त्यांना योग्य अद्दल कशी घडवतात, याचा प्रत्यक्ष अनुभव मंगळवारी मुंबईच्या खासदार पूनम महाजन आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना आला. भूसंपादन विधेयक मंजुरीच्या वेळी लोकसभेत अनुपस्थित राहिलेल्या 20 खासदारांना नरेंद्र मोदी आणि व्यंकय्या नायडूंनी साप्ताहिक बैठकीत उभं करून झापलं, त्यात या दोघीही होत्या. मोदींचे खडे बोल ऐकून त्यांना मान खाली घालावी लागली.
बहुचर्चित आणि बहुप्रलंबित, चर्चेच्या-वादाच्या भोवर्यात अडकलेलं भूसंपादन विधेयक गेल्या आठवड्यात लोकसभेत मंजूर झालं. अर्थात, एनडीएकडे बहुमत असल्यानं विधेयक मंजुरीत काहीच अडचण नव्हती. बहुधा, हा विचार करूनच भाजपचे 20 खासदार या मतदानावेळी गैरहजर राहिले. ही दांडी त्यांना मंगळवारी चांगलीच महागात पडली आहे.
भूसंपादन विधेयकावरील मतदानाला अनुपस्थित राहिलेल्या 20 खासदारांची नावं संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज साप्ताहिक बैठकीत वाचून दाखवली आणि त्यांची कानउघाडणीही केली. दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन, बाबूल सुप्रियो, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे, वरुण गांधी यांचा त्यात समावेश होता. पक्षाने सादर केलेलं विधेयक तुम्हाला निरुपयोगी वाटत असेल, तर तुम्ही निवडणूक का लढवलीत, इथवर का आलात, असा खोचक सवाल त्यांनी केला. त्याचं कुणाकडेच काही उत्तर नव्हतं. सभागृहात शांतता पसरली. तेव्हाच मोदींचा आवाज आला. तुम्ही 20 जणांनी जागेवर उभे राहा, सगळ्यांना तुम्हाला पाहू दे, असा आदेश देत त्यांनी एका वाक्यात सगळ्यांना चुकीची जाणीव करून दिली.
त्यानंतर, आजच्या बैठकीला उशिरा आलेल्या खासरादारांनाही प्रमुख नेत्यांनी खडसावलं. स्वतः मोदी या बैठकीला दहा मिनिटं आधी पोहोचले होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर चालणार नाही आणि वेळ पाळावी लागेल, अशी सक्त ताकीदच आजच्या बैठकीतून खासदारांना देण्यात आली.