नागपूर : संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना नागपुरात मात्र स्वतंत्र विदर्भाचे झेंडे फडकवण्यात आले. व्ही कॅन संस्थेने (विदर्भ कनेक्शन) वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झेंडा फडकवला. व्ही कॅनच्या या वेगळ्या विदर्भासाठीच्या आंदोलनाला शंभर लोकही उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
नागपुरमधील विष्णूजी की रसोई येथे विदर्भाचा ध्वज फडकवण्यात आला. यानंतर व्ही कॅन उपस्थित सदस्यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रतिज्ञा केली.
वेगळ्या विदर्भाच्या नावावर भाजपाने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वेगळ्या विदर्भाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.