* मोरडेवाडीला थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाह सोहळा
निलेश चव्हाण (पिंपळगाव-आर्वी)
मंचर : सार्वजनिक जीवनात जनतेने भरभरून प्रेम केले आहे. माणसे कमवणे ही सर्वांत मोठी संपत्ती असून, मी जीवनात माणसे कमवली आहेत, असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केले.
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त मोरडेवाडी-मंचर येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वधू-वरांना शुभेच्छा देताना आढळराव पाटील म्हणाले, “ येथील सामुदायिक विवाह सोहळा हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. काळाची गरज ओळखून समाजोपयोगी उपक्रम कार्यकर्ते राबवत आहेत. सामुदायिक विवाह सोहळा चांगल्या पद्धतीने आयोजित केला आहे.” ते पुढे म्हणाले, की जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. मोरडेवाडी येथे हॉल बांधण्याची मागणी होत असून, जागा उपलब्ध करून 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.
या वेळी सहसंपर्क प्रमुख अँड. अविनाश रहाणे, अनिल गिरे, विश्वासराजे थोरात यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले, उपसरपंच सुनील बाणखेले, लक्ष्मण कापोळे, रवींद्र वळसे, गणपतराव वळसे, भगवान ढेरंगे, पांडुरंग मोरडे, संतोष डोके आदींसह वर्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच मीराताई बाणखेले, माणिक गावडे, थोरात यांच्या हस्ते वधूंना नथ प्रदान करण्यात आली.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान व बालविजय गणेश मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष गावडे, संतोष मोरडे, प्रकाश थोरात, बाणखेले यांनी नियोजन केले. सुरेश घुले त्यांनी सूत्रसंचालन केले.