ठाणे : प्रशासकीय आणि राजकीय आघाड्यांवरील अनागोंदीमुळे ठाणे महानगरपालिकेचं तारु भरकटलेलं असतानाच, शुक्रवारी कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारात अक्षरशः ‘राडा’ करून आपल्या असंस्कृतपणाचं दर्शन घडवलं आणि पालिकेची प्रतिष्ठाही धुळीस मिळवली. राजन किणे आणि विक्रांत चव्हाण यांच्यात वैयक्तिक कारणावरून आधी बाचाबाची आणि नंतर जबरदस्त हाणामारी झाली. त्यात महापौर संजय मोरे यांनाही धक्काबुक्की झाली असून पालिकेत तणावाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेत यापूर्वी कधीही असा लाजिरवाणा प्रकार घडला नव्हता.
कॉंग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण आणि राजन किणे यांच्यात अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. चव्हाण महापौरपदासाठी उभे होते, तेव्हाही पाठिंब्यावरून त्यांच्यात खटका उडाला होता. या वादाचा शुक्रवारी भडका उडाला आणि महापालिकेच्या आवारातच टोळीयुद्धासारखं घमासान झालं.