मुंबई : समलैंगिक अधिकारांसाठी संघर्ष करणार्या हरीश अय्यर यांना विवाहासाठी जोडीदार मिळावा यासाठी त्यांच्या आईने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
समलैंगिक विवाहासाठी दिलेली ही भारतातील बहुधा पहिलीच जाहिरात असावी. त्यामुळे त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत बोलताना उपवर हरीश अय्यर म्हणाले, खूप व्यस्त असल्यामुळे मी वैयक्तिक आयुष्यात लक्ष दिले नाही. मी मागील पाच वर्षांपासून एकटा आहे. मला कोणी का भेटले नाही ते माहीत नाही. माझ्या आईलाही चिंता वाटत होती. आईलाही वाटत होते की काही वर्षांनी ती राहणार नाही तेव्हा मी एकटा पडेन.
या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही चांगली स्थळं आली आहेत. पाच स्थळं आली आहेत, परंतु काही शिवीगाळ करणारे ईमेल सुद्धा माझ्या आईला येत आहेत. लोक अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतील हे अपेक्षितच होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आईने गमतीने लिहिले होते की जोडीदार अय्यरच असावा अशी अपेक्षा आहे. लोक त्यावर टीका करीत आहेत. तुम्हाला मुस्लिम का नको, दलित का नको असे म्हणत आहेत. रविवारी वर्तमानपत्रे पाहिली तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि धर्माला प्राधान्य देणार्या जाहिराती सर्रास असतात. परंतु, हे एक गे मुलगा करीत आहे तर त्याचा वेगळा मुद्दा बनविला जात आहे, असे ते म्हणाले.