मथुरा (उत्तर प्रदेश) – दिल्लीहून आगर्याकडे जाणार्या यमुना एक्सप्रेस-वेवर गुरुवारी इंडियन एअरफोर्सचे फायटर प्लेन उतरवण्यात आले. सकाळी साडेसहाच्या सुमारास एअरफोर्सचे फायटर प्लेन विराज-2000 हे दोन वेळा यमुना एक्सप्रेस वे वर उतरवण्यात आले. आपत्कालीन स्थितीत दिल्ली लखनऊदरम्यान एक्सप्रेस वेवर फायटर प्लेन उतरवता येऊ शकते किंवा नाही, याची चाचणी एअरफोर्सकडून घेतली जात होती अशी माहिती मिळाली आहे. या फायटर प्लेनचे लँडींग माइल स्टोन क्रमांक 118 वर करण्यात आली. मात्र, सकाळीच विमान उतरवण्यात आल्याने एक्सप्रेस वेवर वाहतुकीची कोंडी झाली होती. एअरफोर्सचे प्लेन ज्याठिकाणी उतरवण्यात आले त्याठिकाणाहून काही अंतरावरच 25 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होणार आहे.
बुधवारी रात्रीनंतर पहाटे 3 वाजताच यमुना एक्सप्रेस-वे बंद करण्यात आला होता. प्लेन लँडिंगच्या वेली लष्कराशिवाय पोलिसांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. यमुना एक्सप्रेस वेवर लढाऊ विमान उतरवणे हा लष्कराच्या मोहिमेचाच एक भाग आहे. लष्कराने मात्र अद्याप याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.
दिल्लीपासून लखनऊदरम्यान एक्सप्रेस-वे आणि रस्त्यांची जी कामे सुरू आहेत तेथे आप्तकालीन स्थितीत विमानांची लँडिंग केली जाईल असे रस्ते तयार करण्यात येत आहेत. यासंबंधी काही दिवसांपूर्वी एअरफोर्सच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांच्याशी चर्चा केली होती. एअरफोर्स आपत्कालीन स्थितीत रस्त्यांवर लँडींगची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा चाचण्या घेतल्या जात आहेत.