अनुराग वैद्य
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग 85 व 86 मधील सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरामध्ये महापालिका प्रशासनाकडून पाहणी अभियान 21 मे रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 85च्या नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांनी दिली.
या पाहणी अभियानात पालिका अधिकार्यांसमवेत नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर, नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्यासह विभागिय जनता सहभागी होणार आहे.
पावसाळा आता तोंडावर आलेला असल्याने सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील नागरी समस्यांची आणि नागरी सुविधांची चाचपणी करण्याकरता हे पाहणी अभियान आयोजित करण्यात आले असून या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याकरीता स्थानिक नागरीकांना व ग्रामस्थांना आवाहनही करण्यात आले असल्याचे सौ. सुजाताताई पाटील यांनी सांगितले.
नागरिकांनीच आपल्याला भेडसावणार्या नागरी समस्यांची माहिती महापालिका अधिकार्यांना दिल्यास त्या समस्येची तीव्रता व गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येणे शक्य होणार असल्याचे सौ. सुजाताताई पाटील यांनी सांगितले.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात नागरी समस्यांची व नागरी सुविधांची पाहणी करण्याकरता अभियान राबविले जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून सौ. सुजाताताई पाटील यांच्या माध्यमातून सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात येवू पाहणारे विकासपर्व आता कोणी रोखू शकत नसल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.