दिवसाचे ईतिहासात काही ना काही आगळेवेगळे स्थान असतेच. काही दिवस सामान्य असतात तर काही दिवस असामान्य असतात. काही दिवसात घडलेल्या घडामोडी या ईतिहासालाही दखल घ्यायला लावतात. 20 मे. नवी मुंबईच्या राजकीय प्रवाहाचा भविष्यात ज्यावेळी तटस्थपणे ईतिहास लिहीला जाईल, त्यावेळी 20 मे या दिवसाचीदेखील दखल निश्चितच घ्यावी लागेल. 20 मे हा नामदेव भगत यांचा जन्मदिवस. एका सर्वसामान्य कोळी समाजात जन्मलेल्या मुलाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गरूडभरारी मारली. राजकीय व सामाजिक क्षेत्रालाही आपली दखल घ्यायला लावली. एकाद्या सिनेमातले कथानक शोधावे तसा नामदेव भगत यांचा जीवनपट आहे. आज 20 मे. नामदेव भगत यांच्या जीवनपटाचा आढावा घेणे ईष्टच ठरेल.
20 मे 1963 रोजी नेरूळ गावातील रामा भगत या गोरगरीब कोळी परिवारात नामदेव भगत यांचा जन्म झाला. लहानपणापासून कष्ट उपसत जनसामान्यांची निस्वार्थीपणे सेवा करत नामदेव भगत यांनी कळत्या वयापासून जनसेवेचा श्रीगणेशा सुरू केला. ते व्रत आजही नामदेव भगत यांनी जोपासले आहे. उपजत बुध्दीमत्ता असतानाही गरीबीमुळे नामदेव भगत यांना फारसे शिक्षण घेता आले नाही. परिवाराच्या उपजिविकेकरता त्यांनाही रोजगार-व्यवसायात स्वत:ला गुंतवून घ्यावे लागले. पण गरीबीमुळे शिक्षण घेता आले नसल्याचे शल्य आजही नामदेव भगत यांच्या मनात कायम आहे. आपल्यावर जी परिस्थिती आली, शिक्षणामुळे वंचित राहावे लागले, ती वेळ ईतर गोरगरीब मुलांवर येवू नये याकरीता नामदेव भगत यांनी स्वत:ची शिक्षण संस्था उभारली. गोरगरीबांच्या मुलांना अत्यल्प दरात बालवाडीपासून ते पदवीपर्यतचे शिक्षण आज त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दिले जात आहे.
सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपला जनसेवेचा वसा ते व्रत म्हणून जोपासत आहे. नामदेव भगत चॅरिटेबल ट्रॅस्टच्या माध्यमातून व आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून नामदेव भगत जनसेवा करताना व्यस्त असल्याचे आपणास पहावयास मिळतात. मातृॠण फेडणे कोणालाही शक्य नाही. पण मातेच्या प्रेमाची महती व त्या महतीतून आपण घडलो, नावारूपाला आलो याची नामदेव भगत यांना श्वासागणिक जाणिव आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी हजारोच्या संख्येने नामदेव भगत अन्नदान करत आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, गरजूंना वाहन परवाना देणे यासह रूग्णालयीन सुविधेतही नामदेव भगत यांचे योगदान मोलाचे आहे.
धार्मिक क्षेत्रातही त्यांचे आगळेवेगळे अस्तित्व आहे. आध्यात्माची आवड जोपासताना नामदेव भगत यांच्याकडून नेरूळ व सभोवतालच्या परिसरात सातत्याने धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असते. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन, राज्यस्तरीय भजन स्पर्धा, वारकर्यांना मदत अशा विविध माध्यमातून आपली आध्यात्मिक आवड त्यांनी जोपासली आहे.
राजकीय क्षेत्रात नवी मुंबई-ठाण्याच्या कक्षा ओंलाडून राज्याच्या राजकारणात काही प्रमाणात त्यांनी आपला ठसा उमटवण्याचा प्रयास केला आहे. युवा संघटनेत श्रीगणेशा गिरवून प्रदेश सरचिटणिसपर्यत त्यांनी मार्गाक्रमण केले आहे. नगरसेवक ते सिडको संचालकपदापर्यत त्यांनी वाटचाल केलेली आहे. नवी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे.
आजमितीला शिवसेना पक्षात ते सक्रिय असून शिवसेना संघटनेच्या 80 टक्के समाजकारण या उक्तीप्रमाणे ते कार्यरत आहेत. कंत्राटी कामगारांची कायम सेवा, प्रदूषणमुक्त खाडी, अपघातमुक्त पामबीच मार्ग, खाडीअंर्तगत भागातील मंदीर परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, रोजगार निर्मिती अशा विविध उपक्रमाचा पाठपुरावा सध्या सुरू आहे.
नवी मुंबई विकसित होताना यामागे स्थानिक आगरी-कोळी समाजाचा त्याग हा भविष्यात समजला पाहिजे या भावनेतून नेरूळ सेक्टर 24 परिसरात आगरी-कोळी भवनाची निर्मिती ही नामदेव भगत यांच्याच पाठपुराव्यामुळे झालेली आहे. स्थानिक आगरी-कोळी लोकांच्या चालीरिती, आचार-विचार याची इतर समाजाला माहिती व्हावी याकरता नामदेव भगत हे गेली अनेक वर्षे आगरी-कोळी महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन करत आहेत. नेरूळनोडमध्ये चोर्या कमी व्हाव्यात, अपघाताची माहिती व्हावी यासाठी त्यांनी स्वखर्चाने नेरूळमधील रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविले आहेत.
सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यत लोकांच्या गराड्यात जनसेवेमध्ये व्यस्त असलेले नामदेव भगत हे सवार्र्ंनाच पहावयास मिळाले आहेत. अनुभवयास मिळाले आहेत. शून्यातून वाटचाल करत या माणसाने आज स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणेच अनेकदा राजकीय चक्रव्यूहातून मार्ग काढत गरूडभरारी मारलेली आहे. बहूजन वर्गातील या बहूआयामी नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
– संजय बोरकर