नवी मुंबई : नवी मुंबई खाडीअंर्तगत भागात असणारी आगरी-कोळी ग्रामस्थांची मंदीरे व लगतचा परिसर राज्य शासनाच्या माध्यमातून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे प्रभाग 93 चे नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई शहराची निर्मिती शासकीय गरजेतून झालेली आहे. खाडीकिनार्यावर तसेच खाडीलगतच्या परिसरावर भराव टाकून महाराष्ट्र शासनाने नवी मुंबईची निर्मिती केलेली आहे. स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या, ग्रामस्थांच्या तसेच अन्य प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर व योगदानावर नवी मुंबई शहर वसलेले आहे, हे आजही कोणालाही नाकारता येणार नाही. नवी मुंबई विकसित झाली खरी, परंतु स्थानिक ग्रामस्थांची श्रध्दास्थान असणारी पुरातन मंदीरे मात्र आजही खाडीअंर्तगत भागात अविकसित अवस्थेत आहेत. या मंदीरांकडे, देवांकडे जाणारे रस्ते कच्चे व खाचखळग्यांचेच आहेत. वाशी ते बेलापुरदरम्यानच्या भागातील खाडीअंर्तगत भागात असणार्या बामणदेव, झोटींगदेव, समुद्रेश्वर देवयासह अन्य देव आहेत.त्यांची मंदीरे आहेत. ही मंदीरे व त्यातील देव येथील आगरी-कोळी ग्रामस्थांची श्रध्दास्थाने आहेत. खाडीअंर्तगत भागात मासेमारी करण्यास गेल्यावर वादळ, सागरी लाटा व अन्य संकटांपासून हे देवच आपले रक्षण करत असल्याची ग्रामस्थांची धारणा आहे. खारफुटी व अन्य नावाखाली वनविभाग, राज्यशासन वा सिडको तसेच नवी मुंबई महापालिकेने खाडीअंर्तगत भागातील ग्रामस्थांच्या मंदीरांकडे व त्याकडे जाणार्या रस्त्यांकडे सातत्याने आजतागायत कानाडोळा केलेला आहे. महापालिका प्रशासनाने खाडीअंर्तगत भागातील रस्त्यांचे डांबरीकरण केलेले आहे. मात्र मंदीरांकडे जाणार्या रस्त्यांची डागडूजी करण्यास उदासिनताच दाखविली असल्याचे सांगत शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहर ज्या ग्रामस्थांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर, योगदानांवर निर्माण झालेले आहे. त्या ग्रामस्थांच्या श्रध्दास्थानांची, मंदीरांची दुर्रावस्था ही भूषणावह बाब नाही. वाशी ते बेलापुर खाडीअंर्तगत भागातील सर्व मंदीर परिसराचे व त्याकडे जाणार्या रस्त्यांचे राज्य शासन, वनविभाग, महापालिका, सिडको यांनी एकत्रित येवून सर्व्हेक्षण करावे आणि खाडीअंर्तगत परिसरातील मंदीरांची डागडूजी करून त्याकडे जाणार्या रस्त्यांची सुधारणा करावी आणि हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.