मुंबई : सध्या कंगणा राणावतच्या करिअरमधील सुवर्णकाळ सुरु आहे. लागोपाठ तिचे सिनेमे हीट होत आहेत. अशात तिला अनेक जाहिरातीच्या ऑफर येणं सहाजिकच आहे. अशाच प्रकारे आलेल्या एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला नकार दिला आहे.
कंगणाला एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी 2 कोटींची ऑफर आली होती. मात्र अशा जाहिराती करुन समाजात चुकिचा संदेश द्यायचा नाही, असं सांगत तिनं चक्क दोन कोटींच्या या जाहिरातीची ऑफर धुडकावली आहे.
मला फेअरनेस ही संकल्पनाच मुळात पटत नाही. माझी बहीणही सावळ्या रंगाची आहे, तरी देखील ती तितकीच सुंदर दिसते. फेअरनेस क्रीमची जाहिरात करुन मी तिचा अपमान केला असता, असं कंगणानं म्हटलं आहे. मी सेलिब्रिटी असून समाजासमोर चुकीचा संदेश ठेवायचा नाही, असंही कंगणानं स्पष्ट केलं.
कंगणाचं सध्या तिच्या तनू वेड्स मनू सिनेमातील अभिनयासाठी सगळ्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या क्वीन सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते.