पुणे : सतत कुणाच्या तरी प्रतिक्षेत असलेली आणि पुण्याची रात्र रंगवणारी बुधवार पेठ सध्या ओसाड आहे. बुधवार पेठच्या रोषणाईवर सावट आलं आहे. याला कारण ठरलंय नेपाळमधील भूकंप. या रेड लाइट भागात मोठ्या संख्येने सेक्स वर्कर असलेल्या नेपाळी महिला भूकंपामुळे आपल्या गावी गेल्याने बुधवार पेठ ओसाड पडली आहे.
बुधवार पेठेत सेक्स वर्कर असलेल्या नेपाळच्या महिला काही दिवसांपूर्वी आपल्या गावी गेल्या होत्या. पण भूकंपात त्याही सापडल्या. आता पुण्यात मोजक्याच नेपाळी महिला उरल्या आहेत. भूकंपाच्या एक महिन्यानंतर 2 महिला पेठेत दाखल झाल्या. मात्र भूकंपाच्या धक्क्याने त्यांना साधं बोलणंही मुश्कील झालं आहे. या पैकी एका महिलेने तर भूकंपात आपलं अख्ख कुटुंबच गमवलं आहे. दुसर्या महिलेकडे कुटुंबीयांपैकी फक्त 8 वर्षाचा मुलगा आहे, तोही पुण्यात होता म्हणून. नेपाळमधील या सेक्स वर्कर महिलांच्या घरांचा ढिगारा हटवण्यात येतोय. यानंतर त्यांची परिस्थिती काहीशी सुधारेल. पण यामुळे अनेक महिला बुधवार पेठ सोडून गेल्याने परिसर ओसाड झाला आहे.
आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जातो. पण यावेळी गेलो नाही. कारण घरचं राहिलं नाही, असं एका इमारतीत राहणार्या तीन महिलांनी सांगितलं. आम्ही तिथे जाऊन कुठे राहू? उघड्यावर कुठेही राहण्यापेक्षा इथं राहून कुटुंबीयांना मदत करणं योग्य ठरेल, असं नऊ वर्षापासून पेठेत राहणार्या आणखी एका महिलेने सांगितलं. दर दुसर्या दिवशी फोन करून ती आपल्या कुटुंबीयांची विचारपूस करत असते. नेपाळला गेलेल्या महिला परत कधी येतील याची माहिती कुणालाच नाही. पण सरकारी मदतीच्या अपेक्षत त्या असतील. मदत मिळाल्यानंतर घर पुन्हा वसवून त्या परततील, असं एका महिलेने सांगितलं.
पुणे सोडणार्यांमध्ये फक्त सेक्स वर्कर नाही तर त्यांचे मालकही आहेत. भूकंपामुळे अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाल्याने संसार उघड्यावर पडलेत. रोजीरोटीसाठी अनेक नवीन महिला पुण्यात येतील आणि सेक्स वर्कर बनतील, अशी अपेक्षा या महिलांच्या मालकांना आहे. त्यामुळे ते नेपाळला गेलेत. ते नव्या महिलांना आणतील आणि या व्यावसायात ढकलतील, अशी माहिती सेक्स वर्कर महिला आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणार्या सहेली या स्वयंसेवी संघटनेच्या संचालक तेजस्विनी यांनी दिली.