नवी मुंबई : महापालिका प्रभाग १११मध्ये पावसाळी पूर्व कामांची आणि अन्य नागरी समस्यांची पाहणी करण्याकरता महापालिका आयुक्तांनी पाहणी दौरा आयोजित करण्याची लेखी मागणी भाजपाचे दत्ता घंगाळे यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात भाजपाच्या दत्ता घंगाळे यांनी पुढे म्हटले आहे की, प्रभाग १११मध्ये एकही सार्वजनिक शौचालय नाही. यामुळे महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची अडचण होत आहे. सिवूड्स (प.) डेंग्यूचा प्रार्दूभाव वाढला आहे. गटारामधून काढलेला गाळ पदपथावरच असून तो गटारात पुन्हा जावून पावसाळ्यात गटारे चोकअप होवून प्रभाग जलमय होण्याची भीती आहे. वनरूम किचनमध्ये असणार्या परिवारातील मुलांची अभ्यासाबाबत होणारी गैरसोय लक्षात घेता त्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. काही गटारांचे स्लॅप निकृष्ठ दर्जाची असून गटारांवर झाकणेही नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सोसायटीच्या आतील भागात महानगर गॅस खोदकाम करत आहे. मात्र काम पूर्ण झाल्यावर केलेले खोदकाम बुजविले जात नाही. त्यामुळे चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती आहे. सर्व्हिस रोड, जॉगिंग ट्रॅक हा सेक्टर ५० (नवीन) येथील चौकापर्यत नेवून तेथील घाणीचे साम्राज्य असलेली जागा नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. सेक्टर ५० येथील जुन्या एस.टी.पी भुखंडावर तरण तलाव व इनडोअर स्टेडिअम बनविण्याची व्यवस्था व्हावी. संपूर्ण सीवूड्समध्ये रिलायन्स नेट खोदकाम करत असून काम पूर्ण झाल्यावर खोदकाम बुजविले न गेल्याने पावसाळ्यात चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण होवून साथीच्या आजारांना पोषक वातावरण मिळण्याची शक्यता आहे. अक्षर टॉवरपासून ते एनआरआयपर्यत पामबीचमधील लावलेली झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. महापालिका आयुक्तांनी पाहणी दौरा केल्यास प्रभागातील सर्व नागरी समस्यांची पालिका आयुक्तांना जवळून पाहणी करणे शक्य होणार असल्याचे दत्ता घंगाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.