नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच मोदी सरकारमध्ये देशाची लोकशाही धोक्यात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मोदी सरकारने यूपीए सरकारवर लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावले. आम्ही अनेक नव्या योजना, नवे प्रकल्प सुरु केले. अनेक योजनांना गती दिल्याचे ते म्हणाले. तसेच ट्रायचे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी टूजी प्रकरणात लावलेले आरोपही सिंग यांनी फेटाळून लावले.
आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत आहोत आणि पुढेही लढत राहणार. मी कधीही सरकारी कार्यालयाचा वापर माझ्या कुटुंबासाठी केला नाही. मोदी सरकार आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला.
यूपीए सरकार असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला गती नव्हती असा आरोप मोदी सरकारने केला होता. मात्र ज्यावेळी आमच्या सरकारने सत्ता सोडली तेव्हा भारत दुसर्या क्रमांकावरील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था होती.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील कृषी उत्पादन कमी झाले आहे. निर्यातीतही घट झाली आहे. 65 टक्के नागरिक गावांमध्ये राहतात ते मोदी सरकारच्या कारभाराने खुश नाहीत असे मनमोहन म्हणाले.