सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : जिल्हाप्रमुखपद गेल्या अनेक महिने रिक्त असल्यामुळे नवी मुंबईतील शिवसेना संघटना जिल्हाप्रमुखाविना वाटचाल करत आहे. 22 एप्रिल 2015 रोजी झालेली नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूकदेखील स्थानिक सेनापतीअभावी लढली गेली आहे. महापालिका निवडणूकीत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी व हक्काच्या जागांवर झालेला पराभव यामुळे लवकरात लवकर जिल्हाप्रमुख नेमण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यापासून या पदावर अजून मातोश्रीने कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका या पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, ठाण्याचे खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी लढली. युतीच्या जागावाटपात अनेक जागा भाजपाला सोडाव्या लागल्याने त्या त्या भागातील शिवसेना पदाधिकार्यांनी व शिवसैनिकांनी बंडखोरी केली. महापालिका निवडणूकीत शिवसेनेचे 38 नगरसेवक निवडून आले असले तरी त्यातील अधिकांश नगरसेवकांचा स्वत:च्या जनसंपर्काचा व पाठबळाचा अधिक वाटा होता. संघटनात्मक विचार केल्यास शहरप्रमुख विजय माने यांना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात स्वत:च्या भावजयीला विजयी करता आले नाही. शिवसेनेच्या सानपाड्यातील रनरागिणी सौ. विद्या पावगे यांना शिवसेना बंडखोरांमुळेच पराभूत व्हावे लागले. प्रभाग 85-86 हे शहरप्रमुख विजय मानेंच्या लगतच्या प्रभागातही शिवसेना उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान अवघ्या 3 मतांनी धारातीर्थी पडले. विधानसभा-लोकसभा निवडणूकीत जुईनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे मतपेटीतून स्पष्ट होवूनही जुईनगरची एक जागा शिवसेनेला गमवावी लागली.
शिवसेनेचे मातब्बर प्रस्थ व माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर पराभूत झाले. ज्येष्ठ नगरसेविका सौ. इंदूमती भगत याही पराभूत झाल्या. संघटनाबांधणी नसल्याचा व जिल्हाप्रमुखपद रिक्त असल्याचा फटका शिवसेनेला ऐरोली व बेलापुर मतदारसंघात शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर बसला. शिवसेना-भाजपा युती झाली नसती तर किमान 60 जागावर शिवसेनेचे नगरसेवक विजयी होवून स्वबळावर शिवसेनेने सत्ता मिळविली असती असे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. नामदेव भगत, रंगनाथ औटी, विशाल ससाणे, एम.के.मढवी, विनया मढवी यासह अन्य नगरसेवक दुसर्या पक्षातून येवून स्वबळावर जागा जिंकले अन्यथा कमकुवत संघटनाबांधणीमुळे शिवसेनेला 30 जागा मिळविणेदेखील शक्य झाले नसते.
जिल्हाप्रमुख नसल्याने उर्वरित शिवसेना पदाधिकार्यांवर कोणाचाच अकुंश राहीला नाही. खुद्द शहरप्रमुख विजय माने यांच्या निवासी नेरूळ पश्चिम परिसरात नेरूळ सेक्टर 6 ते सेक्टर 28 या दरम्यान शिवसेनेचे 6 उमेदवार पराभूत झाल्याने विजय मानेंच्या नेतृत्वाच्या व संघटनाबांधणीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
उपनेते विजय नाहटा, माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, नामदेव भगत या चार नावांची जिल्हाप्रमुख पदाकरीता शिवसैनिकांत चर्चा होत असून नवी मुंबई शिवसेना पुन्हा एकवार जोमाने वाढविण्यासाठी जिल्हाप्रमुखपदाचा लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.