नवी मुंबई : स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पाद्वारेे जलसंपन्न शहर अशी ओळख असणार्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण योजनेअंतर्गत भोकरपाडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्ती कार्यप्रणालीसाठी आय.एस.ओ. ९००१:२००८ (खडज ९००१:२००८) प्रमाणपत्र प्राप्त झाले असून पाणी पुरवठा व्यवस्थापनाच्या सुयोग्य कार्यप्रणालीवर आय.एस.ओ. मानांकनाची मोहोर उमटली आहे.
प्रमाणपत्राच्या अनुषंगाने बी.एम.क्यू.आर. सर्टिफिकेशन्स प्रा.लि. या आय.एस.ओ. प्रमाणित करणार्या नामांकित संस्थेच्या वतीने भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राची तीन वेळा विविध प्रकारे तांत्रिक पाहणी करण्यात येऊन हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले आहे. यामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी नमुना चाचणी, पंपगृह दैनंदिन नोंदवही, रसायने साठ्याची नोंदवही, यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्ती नोंदवही तसेच इतर अनुषांगिक नोंदवह्या नियमित अद्ययावत ठेवण्याची कार्यवाही होत असल्याचे व त्या परिपूर्ण असल्याचे आढळून आल्याने हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. याआधीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण प्रयोगशाळेस आय.एस.ओ. ९००१:२००८ (खडज ९००१:२००८) प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.
अशाप्रकारे जलशुध्दीकरण केंद्राच्या कार्यप्रणालीस आय.एस.ओ. प्रमाणपत्राने सन्मानित केले जाणे ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने अभिमानाची व आनंदाची गोष्ट असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शहर अभियंता मोहन डगांवकर, मोरबे धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता जसवंत मेस्त्री व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले. महापौर सुधाकर सोनवणे यांनीही हा आय.एस.ओ.चा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेसाठी गौरवास्पद असल्याचे सांगितले आहे.