राजकोट : गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात प्रवेश घेण्यासाठी बिगर हिंदूंना आता श्री सोमनाथ ट्रस्टची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याबाबतचा सूचना फलकही मंदिराच्या आवारात लावण्यात आला आहे.
सोमनाथ ज्योर्तिंलिंग तीर्थधाम हे हिंदूंचे धार्मिक क्षेत्र आहे. बिगर हिंदूंना मंदिरात प्रवेश हवा असल्यास त्यांना सोमनाथ ट्रस्टच्या महाव्यवस्थापकांची परवानगी घ्यावी लागेल त्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेश मिळेल असे ट्रस्टीच्या वतीने लावण्यात आलेल्या सूचना फलकात म्हटले आहे.
१२ ज्योर्तिंलिगांपैकी श्री सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग गुजरात मधील सौराष्ट्र या ठिकाणी आहे. दररोज देशभरातून हजारो भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.
‘बिगर हिंदूच्या प्रवेशासाठी परवानगी बंधनकारक असल्याचा निर्णय सोमनाथ ट्रस्टीचे सचिव(पी.के.लाहिरी) यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच घेतला होता. आम्ही केवळ सूचनेचा फलक लावला’ असे सोमनाथ ट्रस्टचे उपव्यवस्थापक विजयसिंह चावडा यांनी सांगितले.
दरम्यान, या निर्णयाचे कारण विचारले असता सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे चावडा म्हणाले.