ठाणे : भारतात सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुका होत असतात. मतदान करताना मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते. ही शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर ही मतदान खूण अधिक ठळक व मोठी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याबाबतचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक अधिकार्यांना दिले आहेत.
मतदानाच्यावेळी मतदारांच्या बोटाला व्यवस्थित शाई लावली जात नसल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या. त्यामुळे मतदारांच्या बोटाला ब्रशच्या सहाय्याने अधिक ठळक व मोठी खूण करण्याचे निवडणूक आयोगाने ठरवले. तसेच निवडणूक कर्मचारी काडीच्या सहाय्याने ही खूण करत असत. त्याऐवजी ब्रशचा वापर सक्तीचा केला आहे. ही खूण व्यवस्थित केली आहे की नाही याची तपासणी निवडणूक अधिकार्यांनी करायची आहे.
नवीन आदेशाची प्रत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्वाचन अधिकार्यांना पाठवली आहे. निवडणूक प्रशिक्षण काळात याबाबतची माहिती द्यायची आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.