सीतामढी (बिहार)- भाजपा आमदार आणि दोन माजी खासदारांसह 14 जणांना बिहारच्या जलदगती न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 1998 मध्ये सीतामढी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले होते. त्या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने भाजपा आमदार राम नरेश यादवसह 14 जणांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली.
यात संयुक्त जनता दलाचे माजी खासदार नवल किशोर राय आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते व माजी खासदार अन्वारुल हक यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय लोक समता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राम लशन सिंह कुशवाहा आणि सरचिटणीस मोहन कुमार सिंह यांनाही दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. तर माजी खासदार नवल किशोर राय यांचा पोलीस अंगरक्षक सुर्यदेव राय याला पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.
सीतामढी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 ऑगस्ट 1998 रोजी निषेधाचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतप्त निदर्शकांनी कार्यालयावर दगडफेक केली. यात सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आणि काही कर्मचारीही जखमी झाले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या 14 जणांनी पोलिसांवरच हल्ला केला होता. त्यावेळी तेथील पोलिसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याचे रुपांतर जोरदार चकमकीत झाले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. यात माजी आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक राम चरित्र यादव यांचा समावेश आहे.
याप्रकरणी सीतामढी जिल्हा न्यायाधीश रामनंदन प्रसाद आणि पोलीस अधिक्षक परेश सक्सेना यांनी 60 जणांविरोधात डुम्ब्रा पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल केला होता. यातील 45 जणांना सबळ पुराव्यांअभावी मुक्त करण्यात आले. तर जलद गती न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद अर्शद अलि यांनी याप्रकरणात 15 जणांना दोषी ठरवले. यातील 14 जणांवर कलम 307, 322, 324, 353, 147, 148 हे गुन्हे ठेवण्यात आले होते.