* विविध आस्थापनांच्या अधिकार्यांना आ. संदीप नाईक यांच्या सूचना * आमदार आपल्या प्रभागात उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद * ऐरोली आणि कोपरखैरणे भागातील समस्या घेतल्या जाणून
नवी मुंबई : मतदारसंघातील नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार आपल्या प्रभागात हा उपक्रम आ. संदीप नाईक सातत्याने राबवित आहेत. या उपक्रमांतर्गत आ.नाईक यांनी गुरूवारी (ता.4) ऐरोली आणि कोपरखैरणे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली आणि कोपरखैरणे येथील प्रभाग कार्यालयामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विविध विभागांशी संबंधित समस्यांची लेखी निवेदने आमदार महोदयांकडे सादर केली. या निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना आ. नाईक यांनी बैठकीसाठी उपस्थित विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना केल्या.
महावितरण कंपनी, नवी मुंबई महापालिका, सिडको, पोलीस, एमआयडीसी, महानगर गॅस इत्यादी आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या बैठकीस हजेरी लावली होती. त्यांच्या सोबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणच्या उघड्या असलेल्या केबल आणि डीपी बॉक्स तसेच वीजेच्या कामासाठी खोदलेले रस्ते या विषयी नागरिकांनी निवेदने दिली. त्यावर महावितरण कंपनीने पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करुन उघडी उपकरणे बंदिस्त करावीत, त्याचप्रमाणे नादुरुस्त डीपी बदलाव्यात, अशी सूचना आ.नाईक यांनी महावितरणच्या अधिकार्यांना ऐरोली येथील बैठकीत केली.
रेल्वे स्थानकादरम्यानचे वीजेचे पोल सिडकोच्या माध्यमातून पावसाळयापूर्वी दुरुस्त होणे गरजेचे आहे. अन्यथा अपघात होण्याचा धोका आहे, असे सांगून सिडकोच्या अधिकार्यांना हे काम त्वरीत करण्याची सूचना आ.नाईक यांनी केली.
शहरामध्ये घरफोड्या, शैक्षणिक संस्थांच्या आवारात अंमली पदाथारची विक्री, सोनसाखळी खेचण्याचे प्रकार, महिलांची छेडछाड असे गुन्हे वाढल्याचे नागरिकांनी त्यांच्या निवेदनाद्वारे आमदार महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी (पेट्रोलिंग) गस्त वाढवावे, बीट चौक्यांमध्ये पोलिसांनी उपस्थित असावे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजना कराव्यात, अशी सूचना आ.नाईक यांनी पोलिस अधिकार्यांना केली.
पावसाळा तोंडावर आल्याने महापालिकेची आपतकालीन यंत्रणा कार्यान्वित करुन त्या माध्यमातून नागरिकांना गरजेप्रसंगी तातडीने मदत देण्याची सूचना नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे आ. नाईक यांनी पालिका अधिकार्यांना केली.
आजच्या बैठकीत नागरिकांनी अनेक विषयांवर लेखी निवेदने सादर केली आहेत. यापैकी अनेक समस्या स्थानिक पातळीवर सोडविणार आहे. तसेच ज्या समस्या विधानसभेमध्ये मांडून सोडविता येतील, त्या पध्दतीने सोडविणार असल्याची माहिती आ. नाईक यांनी दिली. विशेषत महावितरण आणि सिडकोशी निगडीत विद्युत डीपी, इलेक्ट्रीक मीटर, सिडकोचे विद्युत पोल या विषयीचे प्रश्न विधानसभेत मांडू, असे ते म्हणाले.
आमदार आपल्या प्रभागात ही संकल्पना मी सातत्याने गेली अनेक वर्षे राबवित आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, शासकीय- निमशासकीय खात्यांचे अधिकारी, नागरिक तसेच सामाजिक संघटना यांच्याशी समन्वय आणि सुसंवाद साधून समस्या सोडविल्या जातात. या उपक्रमामध्ये नागरिकांकडून अनेक प्रलंबित विषयांची माहिती मिळते. हे विषय सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये मी पाठपुरावा करीत असतो, अशी माहिती आ. नाईक यांनी दिली.
कोपरखैरणे येथील प्रभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत नागरिकांनी कोपरखैरणे परिसरात नायजेरियन आणि इतर व्यक्तीकडून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरु असल्याची माहिती दिली. त्यावर आ.नाईक यांनी पोलिसांना अंमली पदार्थ विक्री नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा पोलिस ठाण्याबाहेर ढिगारा लागला असल्याची बाब नागरिकांनी आ. नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. या गाडयांकरिता स्वतंत्र यार्ड संदर्भात विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न मांडून समस्या सोडविण्याचे आश्वासन आ. नाईक यांनी दिले. कोपरखैरणे डी-मार्ट ते तीन टाकी येथे वाढत्या वाहतूककोंडीबाबत नियोजन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. पाणी, कचरा आणि स्वच्छतेचा आढावा घेत आ.नाईक यांनी जनजागृती करण्याचा मानस व्ये केला तर आपतकालीन परिस्थिती उदभवल्यास त्यावर मात करण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेने आत्तापासूनच सतर्क राहण्याच्या सूचना संबंधीत अधिकार्यांना केल्या.
कोपरखैरणे येथे झालेल्या बैठकीत प्रभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील, परिमंडळ-1 चे उपायुक्त अशोक मढवी, पोलिस अधिकारी सुर्यवंशी , नगरसेवक शंकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तर ऐरोली प्रभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत समाजसेवक चंदू पाटील, माजी नगरसेवक अशोक पाटील, सिताराम मढवी, जी.एस.पाटील, हिरामन राठोड, समाजसेवक जब्बार खान, दीपक पाटील, राम पाटील, उमाकांत नामवाड, माजी नगरसेवक महादेव थोरात, जयवंत भंडारी, प्रकाश मंत्री, म्हात्रे गुरुजी, जयेश कोंडे, यु.पी.भोसले, राजू धनावडे, नरेंद्र कोटकर, चिंतामण केणी, पालिकेचे विभाग अधिकारी बाळा पाटील आदी उपस्थित होते.