शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांचे महापालिकेला साकडे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील माथाडी उद्यानाकडे महापालिका प्रशासनाने लोर्कापण झाल्यापासून लक्ष न दिल्याने बकालपणा आला आहे. या उद्यानात गेल्यावर अविकसित भुखंडाचे स्वरूप निदर्शनास येते. हे उद्यान माथाडी कामगारांची भावनिक बाब असल्याने महापालिका आयुक्तांनी उद्यानाबाबत पाहणी अभियान राबवून लवकरात लवकर डागडूजी करण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील किराणा दुकान मार्केट व माथाडी भवन यामधील जागेत माथाडी उद्यान विकसित केले. 9 एप्रिल 2006 रोजी या उद्यानाचा लोर्कापण सोहळा झाला. माथाडी नेते संभाजीराव पाटील यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन झाल्याचे पूर्वी तेथील कोनशीलेवरून समजत होते. आजमितीला ती कोनशीला त्या जागेवरून नाहीशी झाल्याचे पहावयास मिळत आहे. उद्यानाचा लोर्कापण सोहळा झाल्यानंतर आजतागायत 9 वर्षे 2 महिन्यात महापालिका प्रशासनाने या उद्यानाकडे लक्ष न दिल्याने उद्यानाला दुर्रावस्था प्राप्त होवून उद्यानाला पूर्णपणे बकालपणा प्राप्त झाला आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी प्रवेशद्वार पूर्णपणे गंजलेले असून गेल्या काही वर्षात उद्यानाचा दरवाजा कधी उघडला असेल की नाही, त्याबाबत प्रश्नचिन्हच आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे सुभाषित लिहीलेले आहे. प्रत्यक्षात आतमध्ये वेगळेच भयावह चित्र पहावयास मिळते. हे उद्यान आहे की अविकसित क्रिडांगण आहे याबाबत संभ्रम निर्माण होतो. हे उद्यान आजही भकास व अविकसित अवस्थेतच आहे. उद्यानाच्या अर्ध्या भागात पूर्णपणे सुकलेले गवत आणि मातीचे ढिगारे पहावयास मिळते. उद्यानातील व्यासपिठाचीही दुर्रावस्था झालेली आहे. उद्यानातील विहीरीवरही जंगली झुडपे पहावयास मिळतात. उद्यानाच्या दुसर्या भागात सुकलेले गवत आणि मृतप्राय छोटेखानी झाडे दिसतात. हे उद्यान कागदोपत्री असले तरी प्रत्यक्षात अविकसित क्रिडांगणच असल्याचा भास होतो. उद्यानाला बकालपणा प्राप्त झाला आहे. उद्यानाच्या बाहेरून व उद्यानाच्या आतून पाहिल्यास कोणत्याही बाजूने ते उद्यान असल्याचे स्पष्ट होत नाही. गेल्या काही वर्षापासून उद्यानाच्या मागील बाजूची संरक्षक भिंत तुटली असून त्यादिशेने उद्यानातील अधिकांश भागावर हरिओम ऍटो गॅरेजवाल्याने अतिक्रमण केले असून महापालिका प्रशासनाने या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप नामदेव भगत यांनी केला आहे.
बाजार समिती आवारातील माथाडी कामगारांना क्षणभर विश्रांती घ्यावी यासाठी माथाडी उद्यानाची निर्मिती झालेली आहे. आज त्या उद्यानाकडे पाहिल्यावर उद्यान कशासाठी बनविले हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. माथाडी कामगारांची भावनिक नाळ जोडल्या जाणार्या उद्यानाची दुर्रावस्था व बकालपणा ही असह्य होणारी बाब आहे. नवी मुंबईतील अधिकांश माथाडी कामगारांनी या माथाडी उद्यानाच्या दुर्रावस्थेकडे माझे लक्ष वेधल्याने या उद्यानाकरीता आपण स्वत: पाहणी अभियान राबवावे. उद्यानाची दुर्रावस्था व बकालपणा आणि उद्यानात गॅरेजचा झालेले अतिक्रमण आपणास पहावयास मिळेल. या उद्यानाशी माथाडी कामगारांचे असलेले भावनिक नाते लक्षात घेता आपण तातडीने उद्यानाच्या सुशोभीकरणास विनाविलंब सुरूवात करावी अशी मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.