तिरुवनंतपूरम : केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी अधिकृत घोषणा केली. आठवडाभरात हा मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावणार असल्याचे हवामान खात्यातील अधिकार्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात उकाड्यात प्रचंड वाढ झाल्यामुळे सर्व देशभरात पावसाची वाट पाहिली जात आहे. केरळमध्ये गेल्या 48 तासापासून पाऊस पडत आहे. केरळमध्ये हवामान विभागाची 14 केंद्रे आहेत. यापैकी 70 टक्क्यांहून अधिक केंद्रांच्या परिसरात सलग दोन दिवस अडीच मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
मॉन्सूनने संपूर्ण दक्षिण अरबी समुद्र व्यापले आहे. मध्य अरबी समुद्राचा काही भाग तसेच लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकमधील काही किनारी प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांतही मॉन्सून दाखल झाला आहे.
कर्नाटक आणि उर्वरित तामिळनाडू, रायलसीमाचा काही भाग, आंध्र प्रदेशचा किनारी प्रदेश आणि बंगालच्या उपसागरातील उत्तर आणि दक्षिण भागात येत्या 48 तासांत मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
भारतात यावर्षी 93 टक्के पाऊस बोईल असा यापूर्वी अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आता 88 टक्के पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.