महापौर सुधाकर सोनवणेंनी मांडली भूमिका
नवी मुंबई : प्रदूषणमुक्त जग साकारणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असून प्रत्येक नागरिकाने याची सुरूवात स्वत:पासून, स्वत:च्या घरापासून केली पाहिजे. स्वच्छ, सुंदर, हरीत नवी मुंबई ही प्रत्यक्षात येण्यासाठी या वाक्याकडे केवळ घोषवाक्य म्हणून न बघता स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक कामांत समस्त नवी मुंबईकर नागरिकांनी शहराविषयीच्या आपुलकीच्या व कर्तव्यभावनेने सहभागी व्हावे असे आवाहन करीत जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रबाळे येथील मुंब्रादेवी डोंगर परिसरात आयोजित वृक्षारोपण समारंभाप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांचेसमवेत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून प्रसिध्द असणारे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक, उपमहापौर अविनाश लाड, माजी खासदार संजीव नाईक, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, नगरसेवक संजू वाडे, नगरसेविका श्रीम. रंजना सोनवणे, श्रीम. संगीता यादव व श्रीम. सुरेखा नरबागे, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, उद्यान विभागाचे उपआयुक्त सुभाष इंगळे, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व सुरेंद्र पाटील आणि प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील काही वर्षात केलेल्या वृक्षलागवडीमुळे व त्यांच्या केलेल्या उत्तम संवर्धनामुळे रबाळे येथील मुंब्रादेवी डोंगर परिसराचा कायापालट झालेला प्रत्यक्षात दिसून येत असून वृक्षारोपण केलेली ८० टक्क्याहून अधिक वृक्षरोपे जगल्याबद्दल त्यांनी उद्यान विभागाचे कौतुक केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे शासन धोरण यशस्वीपणे राबवित याठिकाणी डोंगरावरून पावसाळी कालावधीत वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी बांधलेला बंधारा यातून ही वृक्षराजी बहरली असल्याचे महापौर महोदयांनी सांगितले.
केवळ वृक्षारोपण करून न थांबता ते जगवण्याची काळजीही आपण घ्यायला हवी असे सांगत महापौर सुधाकर सोनवणे यांनी नवी मुंबई शहराची इको सिटीच्या दृष्टीने वाटचाल सुरू असताना आपले नवी मुंबई शहर हरीत बनविण्यासाठी वृक्षप्रेमी नागरिकांनी से.१, सी.बी.डी. बेलापूर बसडेपोसमोरील डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान ( मँगो गार्डन ) येथे उद्यान विभागाच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात येत असलेली वृक्षरोपे घेऊन आपल्या सोसायट्या, वसाहती, परिसर येथील योग्य अशा मोकळ्या जागांमध्ये वृक्षलागवड करावी असे आवाहन केले.
उपमहापौर अविनाश लाड यांनी शुक्रवारी सायंकाळी वाशीच्या मिनी सी शोअर परिसरात प्रामुख्याने फळझाडांची वृक्षरोपे लावण्यात येतील, जेणेकरून विविध पक्षी त्याठिकाणी येतील व नव्या पिढीला पक्ष्यांची ओळख होईल असे सांगितले.
जागतिक पर्यावरणदिनी सुरू झालेला वृक्षप्रेमाचा जागर सदैव जागृत ठेवण्यासाठी याप्रसंगी वृक्षप्रेमी नागरिकांप्रमाणेच विद्यार्थ्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती.