नवी मुंंबई : ग्रीन होप आणि जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती पर्यावरण व वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सालाबादप्रमाणे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्षरोपाची लागवड करुन ते जगवावे, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले.
ऐरोलीच्या सेक्टर-15 येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारील मैदानात या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ वृक्षरोपे लावून करण्यात आला. ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के आदींनी वृक्षरोपे लावली.
पर्यावरण रक्षणाची मोहीम प्रभावी करायची असेल तर नागरिकांचा सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा असल्याचे मत आमदार नाईक यांनी व्यक्त केले. ग्लोबल वॉर्मिंगचा वाढलेला धोका पाहात लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची लागवड होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. डोंगराळ भाग, औद्योगिक परिसर इत्यादी ठिकाणांसोबतच खाडीकिनारी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी खारफुटीचे रोपण आवश्यक असून ग्रीन होपच्यावतीने वर्षभर नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्या भागात कोणत्या प्रकारची झाडे लावावीत याविषयीचे मार्गदर्शन त्याचबरोबर वृक्षरोपांचे वाटपही ग्रीन होपच्यावतीने मोफत करण्यात येते आहे, असे ते म्हणाले. वृक्ष रोपे लावली म्हणजे आपण आपले कर्तव्य पार पाडले असे नाही तर ही वृक्षरोपे जगविणे देखील तितेकच महत्त्वाचे आहे. रबाळे येथील डोंगराळ भागात महापौर सुधाकर सोनावणे ग्रीन होपच्या माध्यमातून निर्माण केलेली हिरवाई हे त्याचे आदर्श उदाहरण असल्याचे आमदार नाईक यांनी नमूद केले. शेततळी, मायक्रो इरिगेशन आदी संकल्पनाच्या माध्यमातून जेथे पाणी उपलब्ध होणे कठीण आहे त्याठिकाणी देखील वृक्षांना उत्तम प्रकारे पाणी देता येते, अशी सूचना त्यांनी केली.
नेरुळ येथील एनआरआय कॉलनी परिसरात ग्रीन होपच्यावतीने वृक्षारोपण मोहिमेचा दुसरा कार्यक्रम पार पडला. येथे माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते वृक्षरोपे लावण्यात आली. जयंत हुदार आणि इतर वृक्षप्रेमी नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.