नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं. त्याला एक वर्षही पूर्ण झालं. आता वर्षपूर्तीनिमित्त देशभरात मोदी सरकारनं केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यात भाजपचे नेते मग्न आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे पंतप्रधान कार्यालयालाच नरेंद्र मोदींनी केलेल्या वर्षभरातील कामाची माहिती नसल्याचं समोर आलं आहे.
मोदी सरकारने वर्षभरात केलेल्या महत्त्वाच्या विकासकामांची यादी अहमदाबादमधील एका माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे अर्जाद्वारे मागवली होती. त्याने माहिती अधिकारीखाली केलेला अर्ज पंतप्रधान कार्यालयाला गेल्या महिन्यातच मिळाला होता. त्या आरटीआय अर्जाला उत्तर देताना आमच्या कार्यालयाकडे यासंबंधीची माहिती नाही, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने संबंधित अर्जदाराला पाठवले.
भाजपचं केंद्रातील सरकार सध्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, बैठका घेत आहे. त्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदींच्या सरकारनं नक्की कोणती कामे केली, त्यातील महत्त्वाच्या 20 कामांची यादी देण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्याने अर्जाद्वारे पंतप्रधान कार्यालयाकडे मागवली होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने अशी कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने सांगत यादी देण्यास असमर्थता दर्शवली आहे.