औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने जागा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू असतानाच या स्मारकाला एमआयएमने विरोध केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकानंतर आता एमआयएमने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सर्वच स्मारकांना विरोध केला आहे. नेत्यांच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावाने हॉस्पिटल बांधा, असा सल्ला एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
आमदार इम्तियाज जलील एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. ते म्हणाले, सरकारी जागांवर थोर नेत्यांचे स्मारक उभारु नये. त्याचे स्मारक उभारायचे असेल तर खासगी जागेवर उभारा, असा टोलाही इम्जियाज जलील यांनी लगावला आहे. सरकारने सरकारी जागेवर लोकांच्या खर्चातून स्मारक बांधू नये. सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर कोर्टात जाऊ, असा सज्जड इशारा देखील आमदार जलील यांनी दिला आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. एमआयएमने आधी मुंडेंच्या स्मारकाला विरोध केला होता. आता शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध केला आहे.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कजवळ म्हणजे महापौर बंगल्यालगतची जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ही माहिती दिली. दुसरीकडे उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मात्र जागेचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीने जागा निवडल्या होत्या. यातील दोन जागा निश्चित करण्यात आल्या. एक जागा महापौर बंगल्याजवळची आहे. समितीने जागेचा अंतिम निर्णय शुक्रवारीच बंद लिफाफ्यात मुख्य सचिवांच्या स्वाधीन केला. मुख्य सचिव पालिका आयुक्त अजोय मेहता यांना हा निर्णय पाठवतील. तेथून तो अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर जागा ताबा घेण्याचे काम सुरू होईल.