नवी दिल्ली : देशभरात ‘मॅगी’वरील संकटे वाढत असतानाच, देशभरातील बाजारपेठांमध्ये लवकरच मॅगीला पर्याय म्हणून आरोग्यदायी आणि सुरक्षित नूडल्स आणण्यात येतील, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितले. पतंजली नूडल्समध्ये मैद्याचे प्रमाण कमी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘टू मिनिट्स नुडल्स’ अशी टॅगलाइन वापरत अल्पावधीतच घराघरात पोहोचलेल्या ‘मॅगी’त शिसे आणि शरीराला अपायकारक घटक अधिक प्रमाणात आढळून आल्याने देशातील विविध राज्यांनी मॅगीला बंदी घातली. त्यानंतर नेस्ले इंडिया या कंपनीनेच देशातील दुकानांतून मॅगीची पाकिटे परत मागवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मॅगीला पर्याय म्हणून बाजारात लवकरच स्वदेशी आणि सुरक्षित मॅगी नुडल्स आणण्यात येईल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितले. मुलांच्या जीभेवर मॅगीची रेंगाळणारी चव आणि त्यांच्या आवडीचे नुडल्स पुन्हा बाजारात घेऊन येईल, असे आश्वासनही रामदेवबाबांनी दिले. पंतजली नुडल्समध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक घटक नसतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
…तरच, मॅगीचं पॅक-अप
मॅगी वादावर बोलताना रामदेवबाबा यांनी संबंधित कंपनीने देशवासियांची माफी मागितली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मॅगीविरोधात सरकारने कठोर पावले उचलल्यास कंपनीला लवकरच पॅक-अप करावे लागेल, असेही ते म्हणाले. विष पेरणार्या कंपन्यांची देशाला गरज नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मॅगीबरोबरच मुलांच्या आवडीचे बॉर्नविटा, हॉर्लिक्ससारखाच पॉवरविटा बाजारात आणणार असल्याचे सांगितले.