माजी खासदार संजीव नाईक यांची माहिती
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबईत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी शुक्रवारी वाशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अनंत सुतार याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचा वर्धापनदिन 10 जून रोजी येतो आहे. 12 डिसेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होणार आहे. 10 जून ते 12 डिसेंबर या कालावधीत पालिका क्षेत्रातील सर्वच्या सर्व 111 प्रभागांमध्ये विधायक कार्यक्रम पक्षाच्यावतीने घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार, महाविद्यालयीन प्रवेशासाठी मार्गदर्शन, युवक आणि युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन, गुणवंत नागरिकांचा सत्कार, आरोग्य तपासणी शिबिरे, बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांसाठी क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी स्वसंरक्षण मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती नाईक यांनी दिली. नवनिर्वाचित शहराध्यक्ष सुतार यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत राष्ट्रवादी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकनेते गणेश नाईक यांनी आपल्यावर विश्वासाने टाकलेली जबाबदारी निश्चितच पार पाडू शिवाय नवी मुंबईत राष्ट्रवादीला सर्व प्रकारे बळकटी देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे शहराध्यक्ष सुतार म्हणाले. पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर निष्ठा असणार्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी चांगली संधी देण्यात येईल. सर्वांना बरोबर घेवून जुलै अखेरपर्यंत कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असे सुतार यांनी नमूद केले.
विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गरजूंना प्रवेश मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती संजीव नाईक यांनी दिली. या संदर्भात पक्षाचे युवक कार्यकर्ते लवकरच प्रत्येक शिक्षण संस्थेत आवाहन पत्रक देणार असूून सनदशीर मार्गांने या संस्थांनी गरजूंना प्रवेश दिला नाही तर त्यांना मोर्चाचा दणका दिला जाईल, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.