मुंबई : मालाडमधील मालवणी येथील विषारी दारुकांडातील मुख्य आरोपी मन्सूर अली लतीफ शेख उर्फ अतिकला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालाड मालवणीतल्या दारूकांडाचा मुख्य आरोपी अतिकला मंगळवारी दिल्लीत अटक करण्यात आली. अतिकला काल रात्री उशिरा विमानाने दिल्लीहून मुंबईला आणण्यात आले. त्याला बुधवारी एस्प्लनेड न्यायालयात हजर केले असता तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या विषारी दारू कांडात आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू झाला आहे.
अतिक हे दारूचे रॅकेट दिल्लीतून चालवत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या दारूसाठी वापरण्यात आलेला कच्चा माल गुजरातहून आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून आठ जणांना निलंबित केले आहे.